१९,१४२ शेतकऱ्यांना मिळाला बियाणे अनुदानाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 12:23 PM2021-06-13T12:23:33+5:302021-06-13T12:23:49+5:30
Agriculture Sector News : १९ हजार १४२ शेतकऱ्यांना बियाणांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत बियाण्यांवर अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. जिल्ह्यातील ६४ हजार १३७ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १९ हजार १४२ शेतकऱ्यांना बियाणांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचे बियाणे वापरावे. यासाठी शासनामार्फत अनुदान दिले जाते. अनुदान देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, ऑनलाइन अर्जांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अनेक लहान गावांमध्ये अर्ज करण्याची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना अर्ज करण्याकरिता शहरात यावे लागते.
त्यातच कोरोनामुळे सर्वत्र बंद असल्यामुळे अर्ज करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे ऑनलाइन अर्जांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हाभरातून अनुदानासाठी ६४१३७ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. बियाणांची एक बॅग २४०० रुपयांची आहे.
यामध्ये शेतकऱ्यांना ३६० रुपये अनुदान देण्यात येते. कृषी विभागाकडे आलेल्या अर्जाची लॉटरी काढण्यात आली.
त्यानुसार १९१४२ शेतकरी अनुदानास पात्र ठरले. जे शेतकरी अनुदानास पात्र ठरले, त्यांना एसएमएस प्राप्त झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून परमिट दिले जाईल. दोन वर्षे परतीच्या पावसामुळे बियाण्यांची टंचाई निर्माण झाली आहे.