अंबाबरवा अभयारण्यात २ वाघोबांनी फोडली डरकाळी; प्राणी गणनेत ३३१ वन्यप्राण्यांची नोंद

By सदानंद सिरसाट | Published: May 24, 2024 07:18 PM2024-05-24T19:18:02+5:302024-05-24T19:18:51+5:30

गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी प्राण्यांनी दिले दर्शन

2 tigers break out in Ambabarwa Sanctuary; Animal census recorded 331 wild animals | अंबाबरवा अभयारण्यात २ वाघोबांनी फोडली डरकाळी; प्राणी गणनेत ३३१ वन्यप्राण्यांची नोंद

अंबाबरवा अभयारण्यात २ वाघोबांनी फोडली डरकाळी; प्राणी गणनेत ३३१ वन्यप्राण्यांची नोंद

सदानंद सिरसाट-अझहर अली, संग्रामपूर (बुलढाणा): अंबाबरवा अभयारण्यात गुरुवारी बुद्धपौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात निसर्ग अनुभव कार्यक्रमात २७ ठिकाणी वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत अंबाबरवा अभयारण्यात दोन वाघोबांसह ३३१ वन्यप्राण्यांनी दर्शन दिले.

निसर्ग अनुभव कार्यक्रमाच्या पृष्ठभूमीवर सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. अभयारण्यात ७, तर कृत्रिम २४ असे एकूण ३१ पाणवट्यांवर मचान उभारून २७ ठिकाणी वन्यप्राण्यांची गणना पार पडली. विशेष अतिथींसाठी ५ मचान राखीव ठेवण्यात आले होते. दरम्यान, या प्राणी गणनेत १९ वनरक्षक, ४९ वनमजूर, ५ वनपालांसह चिखलदरा येथील १५ (शिकाऊ) प्रशिक्षणार्थी वनरक्षक कर्तव्यावर होते. तसेच निसर्ग अनुभव कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी १० प्राणिप्रेमींनी ऑनलाइन नोंदणी करून सहभाग दर्शविला. यामध्ये मुंबई, अकोला, अमरावती, परभणी, खामगाव, टुनकी येथील निसर्ग व प्राणिप्रेमी सहभागी झाले होते.

यावर्षी अंबाबरवा अभयारण्यात ३३१ वन्यप्राण्यांनी चंद्राच्या लख्ख प्रकाशात दर्शन दिले. यामध्ये २ वाघ, १० अस्वल, २६ नीलगायी, २९ सांबर, ११ भेडकी, १२ गवे, ३७ रानडुक्कर, १ लंगूर, १११ माकडे, २ म्हसण्या उद, ५ रान कोंबड्या, ७४ मोर, ४ ससे, २ रानकुत्रे, १ मुंगूस, ४ चौसिंगे अशा एकूण ३३१ प्राण्यांची नोंद झाली.

गतवर्षी सन २०२३मध्ये अंबाबरवा अभयारण्यात ५१७ वन्य प्राण्यांनी दर्शन दिले होते. यामध्ये वाघ ३, बिबट ३, अस्वल १२, नीलगायी ५४, सांबर ३७, भेडकी १५, गवे ६४, रानडुक्कर ४८, लंगूर ५१, माकडे ११६, रानकोंबड्या २०, रानमांजर ३, मोर ८५, ससे ५, सायाळ १ अशा एकूण ५१७ वन्यप्राण्यांची नोंद आहे.

  • ...अशी पार पडली गणना

जंगलातील पाणवठ्यानुसार विभाग करण्यात आले. प्रत्येक पाणवठ्यावर मचाण उभारण्यात आले. एका मचाणावर वनकर्मचारी आणि एक प्राणिप्रेमी बसले होते. गुरुवारी दुपारी २:०० वाजतापासून शुक्रवारी सकाळी १०:०० वाजेपर्यंत सलग वन्यप्राण्यांचे निरीक्षण करण्यात आले. पाणवठ्यावर येणाऱ्या प्रत्येक प्राण्याची नोंद घेण्यात आली.

  • वन्यजीवप्रेमींनी लुटला थरारक अनुभव

अंबाबरवा अभयारण्यात प्राणी गणनेसाठी पाणवठ्यांजवळ खास मचाण उभारण्यात आले. निसर्ग व वन्यप्राणीप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी यांनी संपूर्ण रात्र जंगलात काढून त्याचा थरारक अनुभव लुटला. पाणवठ्याजवळ उभारलेल्या मचाणावर बसून रात्री तेथे येणाऱ्या प्राण्यांची गणना करण्यात आली.

अंबाबरवा अभयारण्यात २७ ठिकाणी प्राणी गणना पार पडली. यामध्ये २ वाघांसोबत ३३१ वन्य प्राण्यांनी दर्शन दिले आहे. निसर्ग अनुभव कार्यक्रमांमध्ये विविध शहरातील प्राणिप्रेमी सहभागी झाले होते.
-सुनील वाकोडे, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव), सोनाळा, संग्रामपूर

Web Title: 2 tigers break out in Ambabarwa Sanctuary; Animal census recorded 331 wild animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.