बुलडाणा जिल्ह्यातील २० मुले घेताहेत माऊलींच्या आळंदीत आध्यात्माचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 06:13 PM2019-06-02T18:13:03+5:302019-06-02T18:28:38+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास २० मुले गेल्या महिनाभरापासून ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत आध्यात्माचे धडे गिरवत आहेत.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: बोलिलीं लेंकुरें, वेडी वाकुडीं उत्तरें!
करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध!
नाहीं विचारिला, अधिकार म्यां आपुला!
तुका म्हणें ज्ञानेश्वरा, राखा पायां पैं किंकरा!
तुकाराम महाराजांनी माऊलींसाठी म्हटलेल्या ह्या अभंगाच्या ओळींना बुलडाणा जिल्ह्यातील मुले आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींसमोर उजाळा देत आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास २० मुले गेल्या महिनाभरापासून ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत आध्यात्माचे धडे गिरवत आहेत. मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा येथील लक्ष्मण महाराज यांनी या सर्व मुलांची मोफत व्यवस्था आळंदी येथे केली आहे. पाचवी ते दहावीपर्यंतच्या या मुलांना संस्कृतबरोबरच इरत भाषा व आध्यात्माचे शिक्षण दिल्या जात आहे. बालकांमध्ये चांगले संस्कार रुजविण्यासाठी अनेक ठिकाणी मुलांच्या उन्हाळी सुट्टीमध्ये बाल संस्कार शिबीराचे आयोजन करण्याचा नवा पायंडाच निर्माण झाला आहे. मुलांना शाळेला सुट्या लागल्यानंतर एखाद्या मंदिरावर संस्कार शिबीर घेण्याचे अनेक उपक्रम आपल्याला सापडतील. मुलांमध्ये चांगले संस्कार रुजविण्यासाठी त्यांना संस्कृत येणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सुसंस्कारित मन जिवाला कोठेच भरकटू देत नाही. त्यामुळे मुलांचे मन सुसंस्कारित करण्यासाठी आणि तेही प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीतच मुलांमध्ये संस्काराबरोबरच संस्कृतचे ज्ञान देण्यासाठी मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा येथील लक्ष्मण महाराज यांनी बुलडाणा जिल्ह्यातून घाटनांद्र व परिसरातील अशी २० मुले आळंदी येथे नेले आहेत. आळंदी येथील श्रीगुरू देऊ फड याठिकाणी संस्कृत व संस्कार शिबीर घेण्यात येत आहे. त्यामध्ये मुलांना आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच संस्कृत भाषेचा परिचही करून दिला जात आहे. प्रत्यक्ष माऊलींच्या आळंदीत हे शिबीर घेतले जात असल्याने मुलांमध्ये या शिबीराचे एक वेगळे आकर्षण आहे. मुलांची राहण्याची, भोजनाची व त्यांना सांभाळण्याची सर्व जबाबदारी लक्ष्मण महाराज देशमुख यांनी समर्थपणे उचलली आहे.
इंद्रायणी मातेची स्वच्छता
मुलांना सदाचार, साधना, धर्मप्रेम अन राष्ट्रभक्ती शिकवण्या बरोबरच स्वच्छतेचेही महत्त्व त्यांना प्रत्यक्ष कृतीतून पटवून दिल्या जात आहे. प्रत्येक रविवारी आळंदीतील इंद्रायणीच्या परिसरात मुले स्वच्छता करत आहेत.
दैनंदिन कार्यक्रम
सकाळी चार वाजता उठल्यानंतर भ्रमण जप (रामकृष्ण हरी जप), अंघोळ आटोपल्यानंतर पाच ते सहा नगर प्रदक्षणा, माऊली दर्शन, सूर्यनमस्कार, प्राणायक, हनुमान चालिसा, सकाळी ८.३० ते ११ पाठांतर व लिखाण, दुपारी पाठ त्यामध्ये रचना, कौमोदी संस्कृत, सायंकाळी हरिपाठ, झोपण्यापूर्वी गायत्री व मृत्यंूजय मंत्राचा जप असे दिवसभरातील नियोजन असते.
पाल्यांना सुसंस्कारीत करण्यासाठी पालकांनी जागृत होणे गरजेचे आहे. आज संस्कार शिबीर व संस्कृत शिकणे ही काळाची गरज झाली आहे. आळंदी येथे मुलांना आध्यात्माचे धडे देऊन त्यांना सुसंस्कारीत करण्याचा हा प्रयत्न आहे.
लक्ष्मण महाराज देशमुख (आळंदीकर).