मेहकर शहरातून २० कुटुंब गेले आपल्या गावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:43 AM2021-04-30T04:43:46+5:302021-04-30T04:43:46+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासनाने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊन, कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासनाने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊन, कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या बाजूला शासकीय असलेल्या मोकळ्या जागेवर पालावरील जीवन जगत असलेल्या २० कुटुंबांतील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विविध गावी जाऊन भविष्य सांगून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणारे पंधरा ते वीस परिवार या ठिकाणी राहत होते. त्यांच्या कुटुंबातील लहान-लहान मुले-मुली ही शहरातील विविध शाळेमध्ये शिक्षण घेत होती. मात्र, मागील वर्षीही कोरोनामुळे यांच्या व्यवसायावर संकट आले होते. लॉकडाऊनमध्ये एसटी बस सेवा बंद असल्याने व ज्योतिषीचा पिढीजात व्यवसाय करता येत नसल्यामुळे या सर्व परिवारांवर आपल्या गावी निघून जाण्याची वेळ आली होती. आता परत यावर्षीही तीच परिस्थिती निर्माण झाल्याने या कुटुंबांना उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने आपापल्या गावी जाणे बरे अशी भावनात्मक प्रतिक्रिया या लोकांनी दिली. मागच्यावेळी काही प्रमाणावर लॉकडाऊनच्या काळात शहरातील काही दानशूर मंडळींनी जीवनावश्यक वस्तूंची मदत केली होती. मात्र, यावेळी कोणीच त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याचे दुःखही त्यांनी यावेळी व्यक्त केले. ज्योतिष सांगून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या या लोकांना शासनाने मदत द्यावी, अशी मागणीही यावेळी महिला व पुरुषांनी केली आहे.
लॉकडाऊनमुळे बसगाड्याही बंद आहेत. गावातही लोकांचा काही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मजबुरीने आम्हाला आमच्या गावी जावे लागत आहे.
धोंडिराम शिंदे, भविष्यकार.