३० गुंठ्यांत २० क्विंटल हळद, ६ क्विंटल सोयाबीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:33 AM2021-04-06T04:33:08+5:302021-04-06T04:33:08+5:30
साखरखेर्डा येथील गजानन वसंता मंडळकर यांच्याकडे ५ एकर शेती आहे. या पाच एकरात तीन एकर सोयाबीन, एक एकर पपई ...
साखरखेर्डा येथील गजानन वसंता मंडळकर यांच्याकडे ५ एकर शेती आहे. या पाच एकरात तीन एकर सोयाबीन, एक एकर पपई , आणि ३० गुंठ्यांत हळद व सोयाबीन ही पिके खरीप हंगामात घेतली. ३० गुंठे जमिनीत हळद आणि आंतर पीक म्हणून सोयाबीन पेरले. सोयाबीनची काढणी काढली असता त्यांना ६ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले. मागील महिन्यात हळदीची काढणी केली असता ओली हळद ८० क्विंटल निघाली. बाॅयलरमधून काढून ती हळद वाळवावी लागते. वाळल्यानंतर रोलर ग्रेडरमधून बाह्य आवरण काढण्यात येते. ही संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर हळदीच्या वजनात ७० टक्के घसारा होऊन त्या हळदीचे वजन ३० टक्के राहाते. ओली हळद काढणीच्या वेळी ८० क्विंटल असली तरी प्रत्यक्षात तिचे वजन २० ते २२ क्विंटल अपेक्षित असते. पेरणीपासून ते संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत शेतकऱ्याला ५५ हजार रुपये खर्च येतो. आज हळदीला बाजारात चांगला भाव असून, १० हजार रुपये क्विंटल भाव अपेक्षित आहे. २० क्विंटल हळदीचे २ लाख रुपये उत्पादन अपेक्षित आहे. याच ३० गुंठ्यात आंतर पीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली होती. उन्नत शेतीच्या माध्यमातून त्यांनी ६ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेतले. तीन एकरात ही सोयाबीनची पेरणी केली असता एकरी ११ क्विंटलचे उत्पादन त्यांनी घेतले. सोयाबीन इतरांच्या शेतात काळे पडले असता, केवळ नियोजनबद्ध आखणी केल्याने त्यांच्या सोयाबीनला डागही लागला नाही. विशेष म्हणजे जून महिन्यात पेरणीसाठी हे सोयाबीन बीजवायीसाठी योग्य असल्याने कंपनीने सोयाबीनची उचल केली आहे. पपई बाग घेताना नियोजन तर होतेच, परंतु स्वतः मार्केटिंग केल्याने दररोजचा खर्च या पपईमुळे भागला आहे. सोयाबीननंतर रब्बी हंगामात त्यांनी गहू, हरभरा ही पिकेही घेतली आहेत.
उन्नत शेतीच्या माध्यमातून त्यांनी शेती केल्यामुळे उत्पादनात भर पडली आहे. योग्यवेळी मार्गदर्शन हेही त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे.
समाधान वाघ
कृषी सहाय्यक, साखरखेर्डा.