बुलडाणा जिल्ह्यातील २० सोनोग्राफी सेंटर बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 03:06 PM2019-11-29T15:06:42+5:302019-11-29T15:06:52+5:30
ज्या गावांत, तालुक्यात लींग गुणोत्तराचे प्रमाण व्यस्त असेल तिथे लक्ष केंद्रीत करून तपासण्या बारकाईने केल्या जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात नोंदणीकृत १०५ सोनोग्राफी सेंटर असून त्यापैकी २० केंद्र बंद आहेत. स्त्री-पुरूष गुणोत्तराचे प्रमाण प्रती हजारी ९२१ आहे. काही वर्षापूर्वी हे प्रमाण संवेदनशील आकड्यांपर्यंत पोहचले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ९५ केंद्रावर आरोग्य विभाग नजर ठेवून आहे. सोनोलॉजिस्टचा अभाव व इतर त्रुट्यांमध्ये अडकलेल्या चार केंद्राना वर्षभराच्या तपासणीमध्ये सील ठोकण्यात आलेले आहे.
गेल्या दोन वर्षापूर्वी गर्भपातीची काही प्रकरणे जिल्ह्यात उघडकीस आली होती. त्यापैकी काही प्रकरणांचे परराज्यात धागेदोरे जात असल्याने बुलडाणा जिल्ह्याची संवेदनशील म्हणून ओळख निर्माण झाली होती. या कथीतस्तरावर आरोग्य यंत्रणेने विशेष लक्ष याकडे दिले. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील सोनोंग्राफी केंद्रांची दर तीन महिन्याला नियमीत तपासणी सुरू करण्यात आली. पीसीपीएनडीटीच्या बैठकाही वारंवार व्हायला लागल्या. मध्यंतरी राज्यस्तरीय पथकाकडून ड्रयीव्हीची तपासणी झाली. आरोग्य विभागाकडून होणाऱ्या तपासणीच्या भितीने काही सेंटर विनंतरीवरून बंद झाले. तर काही पीसीपीएनडीटी कायद्यात बसत नसल्याचे आढळून आले. कायद्यांतर्गत येणाºया नियमांचे उल्लंघन व त्रुट्या आढळून आलेल्या चार केंद्राना आरोग्य विभागाकडून सील ठोकण्यात आलेले आहे. त्यामध्ये डोणगाव एक, सिंदखेड राजा दोन व चिखली येथील एका केंद्राचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १०५ पैकी ९५ केंद्र सुरू आहेत. डोणगाव येथील प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. मात्र इतर प्रकरणांमध्ये नेमक्या काय त्रुट्या आढळून आल्या याचा अहवाल प्रशासनाने गुलदस्त्यात ठेवला आहे. (प्रतिनिधी)
सहा महिन्यात तीन बैठका
गेल्या सहा महिन्यामध्ये पीसीपीएनडीटीच्या तीन बैठका झाल्या आहेत. पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी ह्या बैठकांवर भर दिला जात आहे. १५ मे, ९ जुलै व १९ सप्टेंबर या कालावधीत तीन बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर चौथी बैठक ही ४ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
गर्भपाताची माहिती देणाºयाने पटकावले लाखाचे बक्षीस
बेकायदेशीर गर्भपाताची माहिती देणाºया खबºयाला पूर्वी मिळणाºया २५ हजार रुपयांच्या बक्षीसात तीनपट वाढ करून ते एक लाख रुपये करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकाच व्यक्तीने हे एक लाखाचे बक्षीस पटकावले आहे. त्याचे नाव गुपीत ठेवण्यात आले आहे.
सोनोलॉजिस्टचा अभाव
सोनोग्राफी केंद्रावर सानोलॉजिस्ट नसणे ही गांभर्याची बाब आहे. काही केंद्र त्याठिकाणी कार्यरत कर्मचारीच चालवत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी तीन सोनोग्राफी सेंटर हे विनंतीवरून बंद करण्यात आले आहेत. त्यामध्ये सोनोग्राफी सेंटरवर सोनोलॉजिस्ट नसल्याचे आढळून आले.
जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्राची नियमीत तपासणी केली जाते. ज्या गावांत, तालुक्यात लींग गुणोत्तराचे प्रमाण व्यस्त असेल तिथे लक्ष केंद्रीत करून तपासण्या बारकाईने केल्या जात आहेत.
- डॉ. प्रेमचंद पंडित,
जिल्हा शल्य चिकित्सक़