२0 साठवण बंधारे होणार
By admin | Published: September 3, 2014 11:31 PM2014-09-03T23:31:08+5:302014-09-03T23:31:45+5:30
विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमाअंतर्गत खामगाव उपविभागात तलाव दुरूस्तीची सुमारे २ कोटींची कामे.
खामगाव : विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमाअंतर्गत सन २0१३-१४ या वर्षात खामगाव उपविभागात कोल्हापुरी बंधारे, पाझर व सिंचन तलाव दुरूस्तीची सुमारे २ कोटींची कामे झाली आहेत. तर २0१४-१५ या वर्षात उपविभागातील शेगाव, खामगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर या तालुक्यात सिंचनासाठी नवीन २0 साठवण बंधारे होणार आहेत. बंधारे निर्मीतीमुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्यावतीने सन २0१२-१३ ते २0१६-१७ या पाच वर्षाच्या कार्यकाळात विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विदर्भातील पावसाचे कमी प्रमाण, अनिश्चितता व अनियमीतता विचारात घेऊन संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ, पावसाच्या पाण्याचे लघू सिंचन योजनाव्दारे जलसंचय करणे तसेच प्रभावी सिंचन उपाययोजना व उत्तम पीक व्यवस्थापनाच्या माध्यमातून कोरडवाहू शेतीची उत्पादकता वाढविणे या शेतकर्यांचे सिंचनक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने कार्यक्रम सुरू आहे. शेतकर्यांच्या शेतातील पाण्याची पातळी वाढून ती उन्हाळ्याच्या दिवसात कायम राहावी याकरीता कोल्हापुरी बंधारे, सिंचन, गाव तसेच पाझर तलाव निर्मितीसाठी शासनस्तरावरून प्रयत्न चालू आहेत.
खामगाव उपविभागात सन २0१४-१५ या वर्षात २0 बंधार्याला मंजुरात मिळाली असून खामगाव तालुक्यात ७ साठवण बंधारे, शेगाव तालुका ३, जळगाव जामोद ५ व संग्रामपूर तालुक्यात ५ असे २0 साठवण बंधारे होणार आहेत. गतवर्षी बंधारे व तलाव दुरूस्तीसाठी जवळपास २ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. उपविभागातील गणेशपूर, लोखंडा, गारडगाव, कारेगाव, गव्हाण, अंत्रज, पिंप्राळा, शहापूर, वरखेड, भिलखेड व बावनबीर येथील कामे प्रगतीपथावर आहेत. सुटाळा येथील बोर्डी नदीवरचा अनिकट व सुजातपूर येथील कोल्हापुरी बंधार्याचे काम महात्मा फुले जलसंधारण अभियानाअंतर्गत पूर्ण केले आहे.
सन २0१४-१५ मध्ये खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी, संभापूर, चिंचखेड बंड, शिर्ला, हिंगणा कारेगाव, शेलोडी, पारखेड, पिंप्री कोरडे, हिवरा बु., व अटाळी तर शेगाव तालुक्यातील मोरगाव डिग्रस, लासुरा, तिंत्रव, जळगाव जामोद तालुक्यातील जामोद, इस्लामपूर येथील जुन्या बंधारे व तलावाच्या दुरूस्तीस मंजुरात मिळाली आहे. या तलावाच्या दुरूस्तीमुळे ४00 ते ४५0 हेक्टर शेतीला लाभ मिळू शकतो. यामुळे शेतकर्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
* उन्हाळ्यातही जलपातळी कायम
शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी बंधारे निर्मितीचा कार्यक्रम सुरू आहे. बंधार्यात साचलेल्या पाण्यामुळे विहिरीची जलपातळी वाढून उन्हाळ्याच्या दिवसात शेतकर्यांना सिंचन करता आले आहे. खामगाव तालुक्यातील गणेशपूर व लोखंडा येथे गतवर्षी डोह खोलीकरण केल्याने या भागात पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. उपविभागात बहूतांश ठिकाणी आतापर्यंत शासनाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या तलावाचा शेतकर्यांना फायदा झाला आहे.
*१७ बंधार्याची दुरूस्ती होणार
खामगाव उपविभागात ४४ कोल्हापुरी बंधारे, ११ सिंचन तलाव, ५४ पाझर तलाव व २२ गाव तलाव आहेत. विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमाअंतर्गत या बंधारे व तलावाची आवश्यकतेनुसार दुरूस्तीचे कामे सुरू आहे. सन २0१४-१५ वर्षात खामगाव तालुक्यात ११, शेगाव तालुक्यात ३, जळगाव जामोद तालुक्यातील ३ अशी एकुण १७ बंधार्याची दुरूस्ती होणार आहे.
बंधारे व पाझर तलावाची गतवर्षातील ८0 टक्के कामे पूर्णत्वास गेली आहेत. उर्वरीत कामे पावसाळा संपल्यानंतर सुरू होणार. नवीन बंधारे व जुन्या बंधार्याची दुरूस्ती याचा शेतकर्यांना फायदा होईल.
- पी.यु. सरदार, उपविभागीय अधिकारी, सिंचन उपविभाग जि.प. खामगाव.