श्री संत सखाराम महाराज पुण्यतिथी महोत्सव; वारकरी दिंड्यांच्या निनादात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2023 09:02 PM2023-01-26T21:02:54+5:302023-01-26T21:03:38+5:30
श्री संत सखाराम महाराज पुण्यतिथी यात्रा महोत्सवाचे यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे हेलिकॅप्टर मधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली
प्रा.नानासाहेब कांडलकर
जळगाव जामोद- श्रीसंत सखाराम महाराज पुण्यतिथी यात्रा महोत्सवानिमित्त गुरुवार दि.२६ जानेवारी वसंत पंचमीला सखारामपुर (इलोरा) येथे अकोला,बुलढाणा,अमरावती,वाशिम व जळगाव खान्देश या जिल्ह्यातून सुमारे २०० वारकरी दिंड्या दाखल झाल्या होत्या.त्यामुळे सखारामपुर हे अक्षरशः हरिनामाच्या गजरात दुमदुमून गेले होते. यावेळी प्रथमच हेलिकॅप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली.या यात्रा महोत्सवात सुमारे एक लाख भाविकांची उपस्थिती होती .
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर गत दोन वर्षांमध्ये श्रीसंत सखाराम महाराज पुण्यतिथी यात्रा महोत्सव संपन्न झाला नव्हता.त्यामुळे यावर्षी अत्यंत उत्साहात हा यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला.श्री ज्ञानेश्वरी पारायण,हरिकिर्तन व हरिपाठाने महोत्सवाची आध्यात्मिक रंगत वाढली होती.हभप परमेश्वर महाराज जामनेर,ह भ प एकनाथ महाराज पारनेर,ह भ प शिवानंद महाराज शास्त्री श्रीक्षेत्र पैठण,ह भ प उल्हास महाराज सूर्यवंशी श्रीक्षेत्र आळंदी,ह भ प बाळासाहेब महाराज चोपदार श्रीक्षेत्र आळंदी,ह भ प गोपाळ महाराज उरळ व ह भ प तुकाराम महाराज सखारामपुर यांनी किर्तन सेवा समर्पित केली.
पाऊले चालती सखारामपुरची वाट
विदर्भ,मराठवाडा व जळगाव खानदेश येथून सुमारे २०० वारकरी दिंड्या ह्या सखारामपुर येथे दाखल झाल्याने येथील वातावरण हे भक्तिमय बनले होते. प्रत्येक राहुटीवर हरिनामाचा गजर आणि किर्तनसेवा सुरू होती.या यात्रा महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे ही शुद्ध वारकरी यात्रा आहे.येथे मनोरंजनाला कुठलाही थारा नाही .
मान्यवरांनी लावली हजेरी
यात्रा महोत्सवाला माजी मंत्री तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉ.संजय कुटे,बाळापुरचे आमदार नितीन देशमुख,मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती,शिवचंद्र तायडे,रामविजय बुरुंगले, प्रसेनजित पाटील,डॉ.स्वाती वाकेकर,बबलू देशमुख यांचेसह मान्यवरांनी भेट देऊन श्रीसंत सखाराम महाराजांचे दर्शन घेत ह भ प श्रद्धेय श्री तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेतले.
हेलिकॅप्टरमधून पुष्पवृष्टी
श्री संत सखाराम महाराज पुण्यतिथी यात्रा महोत्सवाचे यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे हेलिकॅप्टर मधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली.या हेलिकॉप्टरचे नियोजन माजी आमदार चैनसुख संचेती यांनी केले होते.या हेलिकॉप्टरमधून देवगडचे ह भ प भास्करगिरी महाराज,सखाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह भ प तुकाराम महाराज,चैनसुख संचेती,राहूल संचेती यांनी प्रथम हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली तर नंतर भैयाभाऊ बकाल,रामभाऊ झांबरे,सचिन देशमुख,हरिभाऊ अरबट यांनी पुष्पवृष्टी केली.हे यावेळीची मुख्य आकर्षण ठरले.
रथाची आकर्षक वारकरी नगरपरिक्रमा
श्रीसंत सखाराम महाराजांची प्रतिमा असलेल्या रथाची शोभायात्रा टाळ,विणा,मृदुंग व हरिनामाच्या गजरात काढण्यात आली होती.या रथयात्रेसमोर सात अश्व पावली टाकत चालत होते.यावेळी हभप तुकाराम महाराज व हभप भास्करगिरी महाराज देवगड यांची उपस्थिती होती.