२१0६ मतदारांचा मतदानाचा हक्क कायम राहणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2016 01:47 AM2016-08-23T01:47:31+5:302016-08-23T01:47:31+5:30
हुतात्मा वीर जगदेवराव सह.सूतगिरणी निवडणूक : सर्वोच्च न्यायालयाचा याचिकेवर निर्णय
मलकापूर (जि. बुलडाणा), दि. २२ : येथील हुतात्मा वीर जगदेवराव कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणीच्या मतदार यादीतील २१0६ मतदारांची नावे कमी करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेली याचिकेवर २२ ऑगस्ट रोजी निर्णय होऊन सर्वोच्च न्यायालयाने ह्यत्याह्ण २१0६ मतदारांचा मतदान हक्क कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
येथील हुतात्मा वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणीच्या संचालक मंडळाच्या प्रारुप मतदार यादीतील २२१२ मतदार संख्येवर विद्यमान संचालक गजानन लांडे, भोजराज शेलकर व अँड.साहेबराव मोरे या तीन संचालकांनी आक्षेप नोंदविला होता. या आक्षेपावरून नागपूर येथील निवडणूक निर्णय अधिकार्यांनी अर्हता दिनांकापर्यंत दोन वर्षे पूर्ण झाली नसल्याने अपात्र म्हणून २२१२ मतदारांपैकी २१0६ मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही केली होती. सदर प्रकरण लावून धरत लांडे व शेलकर यांनी तब्बल ६४ तक्रारी केल्या होत्या. त्यावर मतदार यादीतील २१0६ मतदारांची नावे वगळण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा नागपूर येथील प्रादेशिक उपसंचालक (वस्त्रोद्योग) यांनी २३ मे रोजी दिले होते. मतदारांची नावे कमी करण्याच्या निर्णयाविरुद्ध संचालक शरद पाटील व इतर तीन जणांनी त्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली होती.
त्यामुळे निवडणूक प्रक्रिया अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आल्यानंतर थांबविण्यात आली होती. उच्च न्यायालय नागपूर यांच्यासमोर दाखल झालेले रिटपिटीशन क्र. ३३0८/१६ हे निकाली काढत याचिकाकर्त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावत २0१६ मतदार कमी करण्याचा निवडणूक अधिकार्यांचा आदेश कायम ठेवला होता, तसेच निवडणूक प्रक्रियेस उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १७ जून २0१६ रोजी दिलेली स्थगिती उठवित १0 ऑगस्ट २0१६ पासून सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम पुढे सुरु ठेवण्यात आल्याचे आदेश सहायक निबंधक सहकारी संस्था मलकापूर यांना देण्यात आले होते.