बुलडाणा जिलह्यातील २२३ संदिग्ध कोरोनो रुग्ण ‘क्वारंटिन’मधून मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 11:08 AM2020-04-12T11:08:16+5:302020-04-12T11:08:33+5:30
२२३ जणांना आजपर्यंत संबंधीत कक्षातून आरोग्य विभागाने सुटी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना संसर्ग झाल्याच्या संशयावरून गेल्या एक महिन्यात होम क्वारंटीन, हॉस्पीटल क्वारंटीन आणि आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या जिल्ह्यातील २२३ जणांना आजपर्यंत संबंधीत कक्षातून आरोग्य विभागाने सुटी दिली आहे.
एकीकडे बुलडाणा जिल्ह्यातील सात तालुक्यात तब्बल १७ कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली असताना गेल्या महिनाभराचा आढावा घेतला असता ही बाब समोर आली आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याच्या दृष्टीने ही दिलासा व समुह संक्रमणाचा धोका कमी होण्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. २८ एप्रिल रोजी कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रथमत: बुलडाण्यातच चार रुग्ण आढळून आले होते तर टप्प्या टप्प्याने चिखली, देऊळगाव राजा, चितोडा, सिंदखेड राजा, शेगाव आणि मलकापूर येथे कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून आले होते.
जिल्ह्यातील दोन टक्के लोकसंख्या ही या १७ कोरोनाग्रस्तांच्या घराच्या परिघात राहत असल्याने समुह संक्रमणाचा धोका वाढला होता.
त्या पार्श्वभूमीवर ही जिल्ह्याच्या दृष्टीने एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. यामध्ये होम क्वारंटीनमधून आजपर्यंत ७५ जणांची तर हॉस्पीटल क्वारंटीनमधून १०७ जणांना सुटी दिली आहे. आयसोलेशन कक्षात पाठविण्यात आलेल्या ४१ जणांनाही आरोग्य विभागाने प्रोटोकॉलनुसार तपासण्या केल्यानंतर सुटी दिली. यामध्ये बुलडाणा येथून १९, खामगाव आणि शेगाव येथील आयसोलेशन कक्षातील प्रत्येकी ११ जण आहेत. सध्या बुलडाण्यात आयसोलेशनमध्ये ११, खामगावात एक आणि शेगावात ११ जण आहेत.
आजपर्यत २३६ स्वॅब पाठवले
गेल्या एक महिन्याच्या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यातून २३६ व्यक्तींचे स्वॅब नमुने पाठवले असून त्यापैकी १७ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान १७६ स्वॅब नमुने हे निगेटीव्ह आलेले आहेत. अद्यापही ४३ जणांच्या नमुन्यांची प्रतीक्षा आहे. शनिवारी एकुण १६ जणांचे नमुने पाठविण्यात आलेले आहेत. यात मलकापूरचे नगराध्यक्ष, दोन नामांकित डॉक्टर व तीन कंपाऊडरचाही समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १७ जणांच्या चाचण्या पॉझीटीव्ह आल्या असल्या तरी त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झाले आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. विशेष म्हणजे जे बाधीत झालेले आहेत त्यांच्या हायरिस्क संपर्कातील व्यक्तींनाच बाधा झाली आहे. हे एक प्रकारे संक्रमण असले तरी प्रत्यक्षात समुह संक्रमणात ते मोडत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने हायरिस्क संपर्कासोबतच लो रिस्क संपर्कातील व्यक्तींचीही आरोग्य तपासणी केल्यामुळे मोठा धोकाही टळला आहे.
इंडोनेशिया, मलेशियातून आलेल्या १२ जणांचेही स्वॅब नमुने गेल्या महिन्यात पाठविण्यात आले होते. त्यांचेही अहवाल हे १८ मार्च दरम्यान निगेटीव्ह आले होते. त्यामुळे या १२ जणांनाही नंतर सुटी देण्यात आली होती. आजपर्यंत सुटी देण्यात आलेल्या २२३ व्यक्तींमध्ये या विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. दरम्यान, तुर्तास तरी जिल्ह्यात समुह संक्रमणाचा धोका नाही प्रसंगी काही संदिग्ध रुग्ण वाढतीलही मात्र कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे समुह संक्रमण रोखण्यावर भर दिला जात आहे.