बुलडाणा जिल्ह्यात ११ महिन्यात २४ लाचखोर जाळ्यात
By admin | Published: December 15, 2014 11:44 PM2014-12-15T23:44:59+5:302014-12-15T23:44:59+5:30
लाचखोरीत बुलडाणा महसूल विभाग अव्वल.
बुलडाणा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील ११ महिन्यात २४ लाचखोर कर्मचार्यांना जाळ्यात अडकवून त्यांचा भ्रष्ट चेहरा जनतेच्या समोर आणला. या लाचखोरीमध्ये प्रथम क्रमांक महसूल तर दुसर्या क्रमांकावर पोलीस विभाग आहे.
मागील जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीपैकी या विभागाने सापळा रचून २४ लाचखोर अधिकारी कर्मचार्यांना जाळ्यात अडकविण्यात आले. या लाचखोरांमध्ये नेहमीप्रमाणे प्रथम क्रमांक महसूल विभागाचा लागतो. मागील अकरा महिन्यात तब्बल ९ कर्मचार्यांना पकडण्यात आले. यामध्ये सर्वाधिक तलाठी त्यानंतर लिपिकाचा नंबर लागतो. महसूलपाठोपाठ दुसर्या क्रमांकावर पोलीस विभाग येतो. पोलीस विभागातील पाच कर्मचार्यांना सापळा रचून पकडण्यात आले, तर आरोग्य विभाग आणि राज्य परिवहन महामंडळाचे प्रत्येकी दोन कर्मचारी आणि विक्रीकर व कृषी विभागाच्या प्रत्येकी एका कर्मचार्यास पकडण्यात आले, तर इतर लोकसेवकांपैकी दोन कर्मचार्यांना लाच घेताना पकडण्यात आले.
*दुपटीने झाली वाढ
मागील वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून टाकलेल्या धाडीत १२ जणांना कारागृहाची हवा दाखविली होती. यामध्येही महसूल विभाग आघाडीवर होता. तर पोलीस विभाग दुसर्या क्रमांकावर होता. यावर्षी यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. ११ महिन्यात २४ कर्मचार्यांना जाळ्यात अडकविण्यात आले. देशभरात भ्रष्टाचारावर मोठी चर्चा होत असतानाही लाच घेणार्या कर्मचार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.