सिंदखेड राजा विकास आराखड्यासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 03:48 PM2018-01-11T15:48:56+5:302018-01-11T15:54:55+5:30
बुलडाणा : राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथील विकास आराखड्यासाठी राज्यशासनाने १११ कोटी ६८ कोटी रुपयांचा विकास आराखडा बनवला असून पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी रुपये खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
- नीलेश जोशी
बुलडाणा : राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथील विकास आराखड्यासाठी राज्यशासनाने १११ कोटी ६८ कोटी रुपयांचा विकास आराखडा बनवला असून पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी रुपये खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी हा आराखडा वेगाने पुर्णत्वास जावा यासाठी तब्बल तीन वेळा बैठका घेऊन त्याच्या कामास वेग देण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत.
दरम्यान, पुरातत्व विभाग, पालिका, सार्वजनिक बांधकाम विभागा व अन्य विभागाच्या समन्वयातून हा विकास आराखडा पूर्णत्वास जाणार आहे. त्यानुषगाने पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असून त्यामधून प्रामुख्याने पुरातत्व विभागाशी संबंधित कामे करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
यामध्ये लखुजी राजे भोसले राजवाडा विकास, चावडी (जीर्ण राजवाडा) विकास, सावकार वाडा, रंग महाल, काळा कोट किल्ला, समाधी (लघुजी राजे जाधव स्मारक विकास), रामेश्वर मंदीर, नीळकंठेश्वर मंदीर, चांदणी तलाव, सजणा बारवा, पुतळा बारव आणि राजवाड्यातील प्रसाधन गृहांची कामे करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२ जानेवारी २०१५ मध्ये जिजाऊ सृष्टीवरील कार्यक्रमादरम्यान विदर्भ पंढरी शेगावच्या धर्तीवर सिंदखेड राजा नगरीचा विकास करण्याची घोषणा केली होती. त्यास तत्कालीन पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा करून सिंदखेड राजा विकास आराखड्यास सर्वानुमते २८ सप्टेंबर २०१५ रोजी मान्यता देण्यात आली होती. दरम्यान तीन जानेवारी २०१६ ला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिकर समितीच्या बैटकीत सिंदखेड राजा विकास आराखड्याच्या अनुषंगाने प्रथम टप्प्यासाठी २५ कोटी रुपयांच्या कामास मान्यता देण्यात आली होती.
त्यानुषंगाने ३१ मार्च २०१७ रोजी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने राजमाता जिजाऊ जन्मस्थळ, सिंदखेड राजा पर्यटन विकास आराखड्यास प्रत्यक्षात शासन निर्णय काढून प्रशासकीय मान्यता दिली होती. शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे सिंदखेड राजा विकास आराखड्यातील प्रथम टप्प्यातील २५ कोटी रुपयांच्या निधी पैकी दोन कोटी रुपयांचा निधी २०१६-१७ या वर्षात वितरीत करण्यात आला होता.
त्यानुषंगाने नागपूर येथील क्रिएटीव्ह सर्कलकडून प्राप्त अंदाजपत्रकानुसार सिंदखेड राजा विकास आराखड्याच्या अंतर्गत सिंदखेड राजा स्मारकाच्या विविध कामांचे अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. अल्पावधीतच त्यास मान्यता मिळून प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. प्रारंभी ३११ कोटींच्या घरात असलेला हा आराखडा काही काळ मंत्रालयीनस्तरावर पडून होतो. त्यानंतर त्यात सुधारणा करून तो १११ कोटी ६८ लाख रुपयांचा करण्यात आला.