‘समृद्धी’वर धगधगला मृत्यू; २५ ठार, बस डाव्या बाजूला उलटून २५ फुटांपर्यंत घासत गेली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 06:04 AM2023-07-02T06:04:38+5:302023-07-02T06:04:45+5:30
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाने हा थरार आणि मृत्यूचे धगधगते तांडव अनुभवले.
मुकुंद पाठक/नीलेश जाेशी
सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) : मध्यरात्र उलटून गेलेली. कीर्रर्र अंधार. सुनसान रस्ता. वायुवेगाने वाहने धावताहेत. अचानक जोरात आवाज होतो. चेंगराचेंगरी, किंकाळ्या. मदतीसाठी याचना. कारण चहूबाजुंनी त्यांना धगधगत्या काळाने मृत्यू बनून आवळलेले असते... २५ जीवांच्या देहांचा तासाभरात कोळसा झालेला असतो...
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाने हा थरार आणि मृत्यूचे धगधगते तांडव अनुभवले. कुणी पहिल्या नोकरीच्या पहिल्या दिवसाची स्वप्न डोळ्यांत साठवून निघालं होतं, तर कुणी लेकीची ॲडमिशन झाली या आनंदात होतं. ७ जणांना तेवढा बचावण्याचा वेळ आणि संधी मिळाली आणि ते काळाच्या कराल दाढेतून बाहेर पडले.
नागपूर येथील विदर्भ ट्रॅव्हल्सची (एमएच २९ बीई १८१९) वातानुकूलित बस शुक्रवारी, ३० जूनला नागपूरवरून समृद्धी महामार्गाने सायंकाळी पुण्यासाठी निघाली हाेती. बसमध्ये ३२ प्रवासी हाेते. वर्धा, यवतमाळ येथे थांबा घेत वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील राधाकृष्ण हाॅटेलला जेवणासाठी सगळे उतरले. त्यानंतर बसचा चालक बदलला. बस कारंजाजवळ असलेल्या इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली.
सिंदखेड राजाकडे जाताना मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास पिंपळखुटा गावानजीक (ता. सिंदखेड राजा) चालकाला डुलकी लागली. बचावासाठी प्रवाशांनी आकांत केला. महामार्गावरून अनेक वाहने गेली. परंतु, आगीचे रौद्र रूप पाहून काेणीही मदतीसाठी धावले नाही. काहींनी व्हिडीओ शूट केले, पण पोलिसांना साधा फोनही केला नाही, असे बचावलेल्यांनी सांगितले.
मृतदेह काढताना हातही थरथरले
जीव वाचवून बसबाहेर पडलेला चालक शेख दानीश याने रुग्णवाहिकेच्या १०८ क्रमांकावर फाेन केल्यानंतर रुग्णवाहिका व अग्निशमन दल घटनास्थळी आले; ताेपर्यंत उशीर झाला हाेता. स्थानिक सिंदखेड राजा, पिंपळखुटा येथील नागरिकही मदतीसाठी धावून आले. मृतदेह बसमधून काढून रुग्णवाहिकेतून नेताना झाेळ्या कराव्या लागल्या. त्यामुळे बचावकार्यात सहभागी पाेलिस व कार्यकर्त्यांचे हातही थरथरले.