बुलडाणा जिल्ह्यातील २५ रुग्णांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:43 AM2020-05-24T10:43:36+5:302020-05-24T10:43:58+5:30
सध्या जिल्ह्यात बुलडाणा आणि खामगाव येथे प्रत्येकी तीन आणि शेगाव येथे दोन अशा आठ रुग्णावर उपाचर करण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील ३६ कोरोना बाधितांपैकी २५ जणांनी कोरोनावर मात केली असून २३ मे रोजी आठ वर्षीय किडणीच्या आजाराने ग्रस्त मलकापूर पांग्रा येथील मुलीने कोरोना विरोधातील लढाई जिंकत गाव गाठले. त्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता जिल्ह्यातील कोरोना बाधितांपैकी ६९ टक्के रुग्ण बरे झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना बाधीत रुग्णाचा पश्चिम वºहाडात बुलडाण्यात पहिला बळी गेला होता. त्यानंतर बुलडाणा जिल्हा हा विदर्भात चर्चेचा विषय ठरला होता. मात्र प्रशासकीय पातळीवरील तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी दिलेली साथ याच्या जोरावर बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साथ नियंत्रणात राहली. एकवेळ बुलडाणा जिल्हा हा जवळपास कोरोना मुक्त झाला होता. मात्र १० मे नंतर परजिल्ह्यातून स्वगृही परतणाऱ्यांची संख्या ७२ हजारांच्यावर गेली तेव्हा जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही प्रमाणात कोरोनाचे संक्रमण सुरू झाले. मात्र पोलिस, महसूल, आरोग्य व जिल्हा परिषदेने नियुक्त केलेल्या शिक्षकांनी कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि त्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रभावीपणे केल्यामुळे वर्तमान स्थितीत तरी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती तशी नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यात बुलडाणा आणि खामगाव येथे प्रत्येकी तीन आणि शेगाव येथे दोन अशा आठ रुग्णावर उपाचर करण्यात येत आहेत. सोबतच १५ प्रतिबंधीत क्षेत्रातील ३४ हजार ४३० नागरिकांच्या सहा हजार ७४५ घरांचे १४४ पथकांद्वारे आरोग्यविषयक सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. परिणामस्वरुप संदिग्ध रुग्णांची माहिती त्वरित मिळत असून कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळतेय.
प्रतिबंधीत क्षेत्रातील १३ जणांना ताप
जिल्ह्यातील १५ प्रतिबंधीत क्षेत्रातील १३ व्यक्तींमध्ये सर्दी, ताप, खोकला व तत्सम आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. सध्या जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये हे १५ प्रतिबंधीत क्षेत्र आहेत. सुदैवाने या व्यक्तींमध्ये ही लक्षणे आढळून येत असली तरी त्यापैकी एकालाही अद्याप कोवीड केअर सेंटरमध्ये रेफर करण्याची गरज भासलेली नाही. एकंदरीत आरोग्य विभागाची सर्व्हेक्षण करणारी पथके सर्वत्र बारकाईने नजर ठेवून आहेत.