काळ्याबाजारात विक्रीसाठी साठवणूक केलेला २५ क्विंटल तांदूळ पकडला
By अनिल गवई | Published: August 4, 2023 09:11 PM2023-08-04T21:11:50+5:302023-08-04T21:12:01+5:30
तालुका पुरवठाविभाग व पिंपळगाव राजा पोलीसांची कारवाई
खामगाव: रेशन लाभार्थ्यांकडून खरेदी करण्यात आलेला आणि काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवणूक करण्यात येत असलेला ५७ कट्टे (२५ क्विंटल) तांदूळसाठा जप्त करण्यात आला. खामगाव तालुका पुरवठा विभाग आणि िपंपळगाव राजा पोलीसांनी ही संयुक्त कारवाई केली असून, तांदळाचा साठा पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पिंपळगाव राजा, निपाणा हद्दीतील रेशन माफीयांमध्ये धांदल उडाली आहे.
विविध योजनेतील धान्य लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आलेल्या तांदळाची १० ते १२ रूपये किलो प्रमाणे खरेदी करणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रीय आहे. भंगार विक्रेत्यांच्या माध्यमातून किरकोळ पध्दतीने खरेदी करण्यात आलेल्या तादंळाची खामगाव भालेगाव बाजार मार्गावरील एका गुदामात साठवणूक करण्यात येत असल्याची गुप्त माहिती खबर्यांकडून मिळाली. या माहितीच्या आधारे छापा मारण्यात आला असता गुदामात साठवणूक करण्यात आलेला ५७ कट्टे तांदूळ जप्त करण्यात आला.
हा साठा सैय्यद आरीफ सै. हकीम (नदीम) असे आरोपीचे नाव असून, त्याच्या विरोधात पिंपळगाव राजा पोलीसांत पुरवठा निरिक्षक विशाल भगत यांनी तक्रार दाखल केली. यावेळी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गुजर, पो काँ. जावेद घटनास्थळी दाखल झाले होते. या कारवाईमुळे िपंपळगाव राजा, निपाणा, ढोरपगाव, भालेगाव बाजार, घाणेगाव, बोरजवळा, राहूड आणि जळका येथील रेशन धान्य खरेदी विक्री करणार्या रेशन माफीयांचे धाबे दणाणले आहे.
अफरातफरीचा संशय
गोदामात तब्बल दिडशे कि्वकटल धान्य होते. गुदामात धाड टाकण्यात आल्यानंतर तब्बल १२ तास विलंबाने पुरवठा विभागाला माहिती देण्यात आली. त्यामुळे गुदामात तांदळाचा साठा नेमका किती, अशा संशयाला वाव आहे. तांदूळ गायब करून गुदामात तांदूळ भरण्यात येऊन कारवाईची तीव्रता कमी करण्यात आल्याची जोरदार चर्चा परिसरात होत आहे.
खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा भालेगाव रस्त्यावरील एका गोदामातून ५७ कट्टे तांदूळ जप्त करण्यात आला आहे. अंदाजे २५ क्विंटल तांदूळ पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये वाहनासह लावण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोदामात तांदळासोबतच इतरही धान्याची साठवणूक करण्यात आल्याचे समोर येत आहे.- विशाल भगत पुरवठा निरिक्षक, खामगाव