२५५ कि.मी.रस्त्यावर हिरवळ!
By admin | Published: February 6, 2016 02:14 AM2016-02-06T02:14:39+5:302016-02-06T02:14:39+5:30
सामाजिक वनीकरण विभागाचा पुढाकार घेऊन बुलडाणा जिल्ह्यातील रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावल्याने सौंदर्यात भर.
हर्षनंदन वाघ /बुलडाणा: सामाजिक वनीकरण विभाग व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्त्यावर मागिल तीन वर्षात १३८ ठिकाणी वृक्ष लागवडीची कामे करण्यात आली. त्यामुळे एकूण २५५ कि.मी. रस्त्यावर हिरवळ पसरली असून, रस्त्यांच्या सौंदर्यात भर पडली आहे. मागिल काही वर्षांपासून वृक्षतोड मोठय़ा प्रमाणात होत असल्यामुळे पर्यावरण संतुलन बिघडले. त्यामुळे पाऊस कमी-जास्त प्रमाणात येत आहे. काही भागात भरपूर पाऊस तर काही भागात पावसाने दडी मारल्याचे चित्र दिसून येत होते. त्यामुळे शासनाने वृक्षलागवडीवर भर दिला. यासाठी सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात आल्या. त्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली. सन २0१३ ते २0१५ दरम्यान एकूण १३८ ठिकाणी कामे करण्यात आली असून, एकूण २५५ कि.मी. रस्त्यावरील अंतरावर हिरवळ पसरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर हिरवळ पसरली असून, परिसरातील मजुरांना रोजगार उपलब्ध झाला होता.