वृक्ष लागवडीसाठी २६ यंत्रणा कार्यरत
By admin | Published: June 3, 2017 12:45 AM2017-06-03T00:45:09+5:302017-06-03T00:45:09+5:30
मोहिमेची अंमलबजावणी तीन टप्प्यांत : ग्रामपंचायत यंत्रणेला सर्वात जास्त उद्दिष्ट
हर्षनंदन वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहीम तीन टप्प्यांत राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी ८.५२ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाच्या मुख्य २६ यंत्रणा मोहिमेत सहभागी होणार आहेत.
झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. त्यामुळे दरवर्षी कमी- जास्त प्रमाणात पाऊस पडतो. यासाठी शासन विविध योजनेंतर्गत ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा नारा देते. विविध योजनांच्या माध्यमातून झाडे जगविण्यासाठी प्रोत्साहन देते. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. राज्यात २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असून, यावर्षी कोटीचे उद्दिष्ट राज्याचे आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याला यंदा ८.५२ लाख वृक्ष लागवड करावी लागणार आहे. यामध्ये सर्वाधिक उद्दिष्ट जिल्ह्यातील ८५९ ग्रामपंचायतींना ३.१५ लाख इतके देण्यात आले आहे, तर सामाजिक वनीकरणचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग राहणार आहे. बुलडाणा जिल्ह्याला मागील वर्षी तीन कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गंत ३ लाख ५३ हजार ६३३ वृक्ष रोपणाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २ लाख ९६ हजार १२७ वृक्ष जिवंत आहेत.
त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी ८ लाख ५२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, सर्वात जास्त उद्दिष्ट जिल्ह्यातील ८५९ ग्रामपंचायतींना ३ लाख १५ हजार वृक्षाचे देण्यात आले आहे.
मोहिमेत सहभागी मुख्य २६ यंत्रणा
बुलडाणा जिल्ह्यात होणाऱ्या वृक्ष लागवडीमध्ये प्रशासनाच्या मुख्य २५ यंत्रणा सहभागी होणार आहेत. त्यात वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, नगर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहकार तथा वस्त्रोद्योग विभाग, शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण विभाग व माध्यमिक शिक्षण विभाग, गृह विभाग, आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभाग, आरोग्य विभागाच्या जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक, महावितरण, अन्न औषध प्रशासनाचे दवाखाने, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कारागृह विभाग, परिवहन विभागाचे राज्य परिवहन विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभाग, विधी न्याय विभाग, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे सिंचन विभाग व पाटबंधारे तसेच कौशल्य विकास विभाग, महसूल विभाग, बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, जिल्हा कोषागार कार्यालय, केंद्र सरकारचे बीएसएनएल व जिल्हा डाक कार्यालय, क्रीडा विभाग तसेच ग्रामविकास विभाग या सर्व शासकीय विभागांना एकूण ८ लाख ५२ हजार वृक्ष रोपण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
मोहिमेची अंमलबजावणी तीन टप्प्यांत
राज्यात पहिल्या टप्प्यात चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, कालावधी १ ते ७ जुलै २०१७ राहणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्याचा कालावधी १ ते ७ जुलै २०१८ राहणार आहे, तर तिसऱ्या टप्प्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्याचा कालावधी १ ते ७ जुलै २०१९ राहणार आहे.