ग्रामीण रुग्णालयासाठी २६ पदे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:46+5:302021-06-10T04:23:46+5:30
मेहकर : तालुक्यातील विवेकानंदनगर येथील नव्याने तयार झालेल्या ग्रामीण रुग्णालयात विविध प्रकारच्या २६ पदनिर्मितीस सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता ...
मेहकर : तालुक्यातील विवेकानंदनगर येथील नव्याने तयार झालेल्या ग्रामीण रुग्णालयात विविध प्रकारच्या २६ पदनिर्मितीस सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे.
आमदार संजय रायमुलकर यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे रुग्णालय मंजूर करून घेतले होते. बांधकामासाठी अंदाजे आठ कोटी रुपये निधी खेचून आणला होता. २०२० मध्ये इमारत बांधकाम पूर्ण झाले असून, बावीस हजार स्क्वेअर फूट मुख्य इमारत व दहा निवासस्थाने पूर्ण झाली आहेत. या ग्रामीण रुग्णालयात पदनिर्मितीस ७ जूनला सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. त्यानुसार १० नियमित व १६ बाह्ययंत्रणेकडून पदे भरण्यात येणार आहेत. एकूण २५ अधिक १ पदांना मान्यता मिळाली आहे. १० नियमित पदात वैद्यकीय अधीक्षक १, वैद्यकीय अधिकारी ३, अधिपरिचारिका ३, भांडारपाल १, औषधनिर्माण अधिकारी १ व कनिष्ठ लिपिक १ अशी १० पदे, तर बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून घ्यावयाच्या सेवांमध्ये अधिपरिचारिका ४, कनिष्ठ लिपिक १, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी १, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी १, प्रयोगशाळा सहाय्यक १, शिपाई-गट ड १, कक्षसेवक गट ड ४, वाहनचालक १ व सफाईगार गट ड २ पदांना मंजुरी मिळाली आहे.
विवेकानंद नगरातील ग्रामीण रुग्णालयात २६ पदांना मंजुरी मिळाली आहे. ही पदे लवकरच भरती करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करणार आहे.
आमदार संजय रायमुलकर