मुल्यवर्धन पोस्टर्स प्रदर्शनाला २६ हजार विद्यार्थ्यांनी दिली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 02:57 PM2020-02-28T14:57:22+5:302020-02-28T14:58:01+5:30
दीड दिवसात या प्रदर्शनाला तब्बल २६ हजार ७३६ विद्यार्थींनी भेट देऊन पाहणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: राज्यातील ६७ हजार जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या मुल्यवर्धन उपक्रमास व्यापकस्तरावर प्रतिसाद मिळत असून २०१६ पासून सुरू असलेल्या या उपक्रमातंर्गत शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनला राज्यातील उपक्रमशील शिक्षकांनी साडेचार हजार पोस्टर्स पाठविले आहेत. त्यातील निवडक पोस्टर्सचे बुलडाणा येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून दीड दिवसात या प्रदर्शनाला तब्बल २६ हजार ७३६ विद्यार्थींनी भेट देऊन पाहणी केली आहे.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसोबतच केवळ पाठांतर, श्रवणावर आधारीत शिक्षण न देता प्रत्यक्ष कृतीतून आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या राज्यातील शाळांमध्ये स्थानिक शिक्षकांनी मुल्यवर्धन अभ्यासक्रमातंर्गत राबविलेले उपक्रम, त्यांना आलेले अनुभव व त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीमध्ये झालेली वाढ याच्या अनुभवांना प्रत्यक्ष पोस्टर्स स्वरुपात रंगवून ते फाऊंडेशनचे अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांना पाठवले आहेत.
अशा साडेचार हजार पोस्टर्स पैकी काही निवडक पोस्टर्स या प्रदर्शनामध्ये लावण्यात आले आहेत. यात बुलडाणा जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांनीही पाठविलेल्या पोर्स्टचा यात समावेश असल्याचे शांतीलाल मुथ्था यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यामुळे शैक्षणिक क्रांतीच्या दृष्टीने हे पोस्टर्स प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे.
त्यामुळेच या प्रदर्शनास दीड दिवसामध्ये २५५ शिक्षक, २६ हजार ७३६ विद्यार्थ्यांसह १२ शाळांनी भेटी दिल्या आहेत. २८ फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले आहे. बुलडाणा येथील शारदा ज्ञानपीठच्या मैदानावर २६ फेब्रुवारी पासून हे प्रदर्शन सुरू आहे.