वैद्यकीय अधिका-यांची २७ पदे रिक्त
By admin | Published: November 17, 2014 12:53 AM2014-11-17T00:53:25+5:302014-11-17T00:53:25+5:30
बुलडाणा जिल्ह्यात तापाचे थैमान : आरोग्य विभाग डायलेसिसवर.
सिद्धार्थ आराख / बुलडाणा
जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. आतापर्यंत तापाचे १५ बळी गेले, तर शेकडो रुग्ण आजही तापाने फणफणत आहेत. शासकीय रुग्णालयासह खासगी दवाखाने फुल्ल झाले असताना जिल्हा परिषद आरोग्य विभाग डायलेसिसवर आहे. जिल्ह्यात ५२ प्रथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत असलेल्या उपकेंद्र आणि इतर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांची २७ पदे रिक्त असल्याची धक्कादायक महिती आहे. याशिवाय तालुका आरोग्य अधिकार्यांची ५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे जि.प.ची आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्यास कुचकामी ठरत आहे.
संपूर्ण राज्यात सध्या डेंग्यू या महा भयानक रोगाने थैमान घातले आहे. थंडी वाजून तीव्र ताप येणे, अंग दुखणे अशा आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुलडाणा जिल्ह्यात अशा प्रकारच्या तापाने आतापर्यंत १५ रुग्णांचा हकनाक बळी गेला. जिल्ह्यात सुरू असलेल्या या आजारावर नियंत्रण ठेवण्यास आरोग्य विभाग कमी पडत असल्याचा प्रत्यय येत आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली असता जिल्ह्यात आरोग्य अधिकार्यांची तब्बल २७ पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. तर ५ तालुका आरोग्य अधिकार्यांची पदे रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे बुलडाणा या जिल्हा मुख्यलयी असलेले तालुका आरोग्य अधिकार्याचेही पद अनेक वर्षांपासून रिक्त आहे. जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत उपकेंद्राचीही संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे; मात्र या रुग्णालयात डॉक्टरच नसल्यामुळे रुग्णालयाचा कारभार प्रभारीवर सुरू आहे. आलेल्या रुग्णांची ता पाच्या गोळ्या देऊन बोळवण केल्या जाते जात आहे.
*खासगी रुग्णालय झाले फुल्ल
ग्रामीण भागात कोट्यवधी रुपये खर्च करून आरोग्य केंद्राच्या इमारती उभारण्या त आल्या आहेत. अत्याधुनिक सुविधा व रुग्णालयात औषधी उपलब्ध आहे; मात्र वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे या आरोग्य केंद्राचा फायदा ग्रामीण भागातील नागरिकांना होत नाही. रुग्णांना आरोग्याचा सुविधा मिळत नाही. आलेल्या रुग्णांना तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी रेफर केल्या जाते. त्यामुळे परिस्थिती नसतानाही रुग्णांना पैसे मोजून खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. परिणामी सध्या शहरातील खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत.
*आरोग्य सेवकांची ६३ पदे रिक्त
वैद्यकीय अधिकार्यांपाठोपाठ जिल्हा परिषद आरोग्य विभागातील महत्त्वाचा दुवा असलेल्या आरोग्य सेवकाची जिल्ह्यात ३0२ पदे आहेत. त्यापैकी ६३ पदे रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे. तर ग्रामीण भागात आरोग्याच्या दृष्टीने लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणात जनजागृती गरज असताना ग्रामीण भागात आरोग्य सेवक फिरकातानाही दिसत नाही. आरोग्य सेवक हे शहरात व विशेषत: शासकीय कार्यालयात जुंपले आहेत. तापाचे शेकडो रुग्ण वार्यावर सोडून आरोग्य विभागात वरिष्ठांची मर्जी सांभाळा आणि नोकरी करा, असा प्रकार सुरू आहे.