बुलडाणा जिल्ह्यात रस्ते अपघाताने घेतले २७० बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 03:07 PM2019-11-22T15:07:37+5:302019-11-22T15:08:00+5:30
जिल्ह्यात आॅक्टोबर अखेर २७० जणांनी आपले प्राण गमविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : रस्त्यांवरील अपघातामध्ये जिल्ह्यात आॅक्टोबर अखेर २७० जणांनी आपले प्राण गमविले आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व अन्य निर्माणा धीन रस्त्यांवर संबंधित यंत्रणा व कंत्राटदारांनी दुरूस्ती, खड्डे बुजविणे, सुरक्षा नियमांची व्यवस्था करावी. रस्ता सुरक्षेप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या कंत्राटदार व संबंधित यंत्रणाप्रमुख यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी तथा रस्ता सुरक्षा समिती प्रमुख डॉ. निरूपमा डांगे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेऊन अपघात प्रवण स्थळांवर तात्पुरत्या स्वरूपातील उपययोजना त्वरित करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित रस्ता कामाचे कंत्राटदार आदी उपस्थित होते. रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकांना सातत्याने गैरहजर असलेल्या अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाल्या, रस्ता सुरक्षा हा सध्याचा ऐरणीवर असलेला विषय आहे. या विषयाशी संबंधित यंत्रणांनी गंभीरतेने काम करायला पाहिजे. समिती कामकाजासंबंधित अहवाल, अपघात घडल्यानंतर देण्यात येणारा संयुक्त अहवाल विनाविलंब सादर करावेत. रस्त्याचे काम करणाºया कंत्राटदारांवर संबंधित यंत्रणेने नियंत्रण ठेवावे. काम सुरू असताना नागरिकांना त्रास होणार नाही, अपघात घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. कंत्राटदार काम करीत नसल्यास देयकांची अदायगी थांबवावी. रस्ता काम सुरू असलेल्या यंत्रणांनी दर आठवड्याला रस्ता कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी म्हणाल्या, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती यांनी मलकापूर ते खामगांव रस्ता कामाचे सुधारीत निवीदा होईपर्यंत या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे फलक लावावेत. मेहकर फाटा ते चिखली शहर रस्त्याचे काम गतीने पुर्ण करण्याच्या सुचनाही दिल्या. यावेळी संबंधित यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)