सरपंचांच्या सात जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात
By संदीप वानखेडे | Published: September 6, 2022 06:42 PM2022-09-06T18:42:50+5:302022-09-06T18:43:48+5:30
सदस्यपदांच्या ६६ जागांसाठी १०९ उमेदवारांमध्ये हाेणार लढत
बुलढाणा : जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ६ सप्टेंबरपर्यंत मुदत हाेती़ सात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी ४६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. त्यापैकी १८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता २८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. थेट जनतेतून सरपंचाची निवड हाेणार असल्याने चुरस वाढली आहे. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ३४ उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतले आहेत. त्यामुळे, आता १०९ उमेदवार रिंगणात आहेत. जळगाव जामाेद तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज न आल्याने ते पद रिक्त राहणार आहे़
जिल्ह्यातील मुदत संपलेल्या आठ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत आहे़ सरपंच थेट जनतेतून निवडण्यात येणार आहे़ त्यामुळे, उमेदवारांची संख्या वाढली हाेती़ उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज मागे काेण घेताे याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. संग्रामपूर तालुक्यातील सायखेड येथे सरपंचपदासाठी आठ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले हाेते़ त्यापैकी दाेन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सहा उमेदवारांमध्ये लढत हाेणार आहे. नांदुरा तालुक्यातील हिंगणा भाेटा येथे सरपंचपदासाठी १० उमेदवार रिंगणात हाेते, त्यापैकी ५ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने पाच जणांमध्ये लढत हाेणार आहे.
लाेणार तालुक्यातील दाेन ग्रामपंचातींच्या सरपंचपदासाठी १७ उमेदवारी अर्ज वैध ठरले हाेते. त्यापैकी १० जणांनी माघार घेतल्याने ७ जणांमध्ये लढत हाेणार आहे. तसेच चिखली तालुक्यातील तीन जागांसाठी ११ अर्ज वैध ठरले हाेते. त्यापैकी एकाने मागे घेतल्याने १० उमेदवारांमध्ये लढत हाेणार आहे.