२८० सायकल स्वरांनी केली लोणार सरोवराची परिक्रमा
By ब्रह्मानंद जाधव | Published: October 7, 2023 05:25 PM2023-10-07T17:25:50+5:302023-10-07T17:27:14+5:30
वाढत्या वाहनांच्या वापरामुळे ध्वनी व हवा प्रदूषण वाढतच आहे. त्यामुळे आवश्यक तेथे सायकल वापरण्याचा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे.
लोणार : निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यायाम व पोषक आहार अत्यंत गरजेचा आहे. वाढत्या वाहनांच्या वापरामुळे ध्वनी व हवा प्रदूषण वाढतच आहे. त्यामुळे आवश्यक तेथे सायकल वापरण्याचा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे, परिसरात सायकलची संख्या वाढत जाईल तसे आपण ''हरित लोणार'' या आपल्या स्वप्नाकडे वाटचाल करू, असे मत पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांनी व्यक्त केले.
ते वन्यजीव सप्ताहानिमित्त ''मी लोणारकर'' टीम व वन्यजीव विभाग मेळघाट यांच्या संयुक्त विद्यमानाने लोणार अभयारण्याभोवती शनिवारी सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीमध्ये सहभागी २८० सायकल स्वरांनी लोणार सरोवराची परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण केली. मानव व वन्यजीव यांचे मैत्रीपूर्ण नाते कायम राहावे, यासाठी दरवर्षी वन्यजीव विभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. यावेळी ही वन्यजीव सप्ताहनिमित्त विद्यार्थ्यांसाठी सायकल रॅली, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांपैकी प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेले शुभांगी विष्णू बाजड, पलक राजेश आढाव, प्राची प्रवीण जायभाये, श्रुती गजानन बगाडे, पूजा ज्ञानेश्वर शिंगणे, सायली शंकर राठोड व रूपेश विजय कोचर या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलच्या प्रांगणात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय अधिकारी वन्यजीव विभाग अकोला निमजे, निमेश मेहेत्रे, घोगरे, प्रकाश सावळे, वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड, सेंट्रल पब्लिक स्कूलचे प्राचार्य दत्तात्रय कुलकर्णी, मुख्याध्यापक रामेश्वर डोळेे, वाघ, सांगळे, इंगळे, विजय जागृत उपस्थित होते. मंडळ अधिकारी संतोष जाधव यांनी सूत्रसंचालन केले. बक्षीस वितरण कविता आघाव यांनी केले.
वन्यजीव सप्ताहासाठी यांचा पुढाकार
या वन्यजीव सप्ताहाच्या आयोजनासाठी सर्पमित्र विनय कुलकर्णी, बंटी नरवाडे, विलास खरात, मी लोणारकर टीमचे सचिन कापुरे, संतोष जाधव, विजय गोरे, समीर शहा, गोपाल सरकटे, रवींद्र तायडे, प्रकाश सानप, भूषण सानप, रोहन सोसे, सुशील सोसे, उमेद चिपडे, सचिन मस्के, शैलेश सदार, अमोल सरकटे, ज्ञानेश्वर कचरे, विनोद थोरवे व संपूर्ण ''मी लोणारकर'' टीम, तसेच वन्यजीव विभागाचे सुरेश माने, सुनीता मोरे, ज्ञानेश्वर शिंदे, सदाशिव वाघ, गजानन शिंदे, निरंजन पोले यांनी परिश्रम घेतले.