जिजाऊ जन्मस्थळ विकासासाठी ३ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:36 AM2021-04-02T04:36:32+5:302021-04-02T04:36:32+5:30
जिजाऊ जन्मस्थळ विकासासाठी फडणवीस सरकारच्या काळात ४११ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी २५ कोटी रुपये प्रत्यक्ष मिळाले ...
जिजाऊ जन्मस्थळ विकासासाठी फडणवीस सरकारच्या काळात ४११ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी २५ कोटी रुपये प्रत्यक्ष मिळाले होते,या निधी अंतर्गत राजवाडा व अन्य पुरातन वस्तूंची कामे सुरू होती. परंतु मध्यंतरी निधीअभावी कामे बंद पडली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी सदरील मागणी लावून धरली होती.तर नगराध्यक्ष सतीश तायडे यांनीही खासदारांच्या माध्यमातून या विषयाचा पाठपुरावा केल्याचे डॉ खेडेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत सन २०१० ते सन २०१९-२० या वित्तीय वर्षात प्रशासकीय मान्यता दिलेल्या जिल्हा स्तरावरील कामांना स्पिल ओव्हरची रक्कम ३१ मार्च २०२१ रोजी शासनाने काढलेल्या जी.आर.नुसार मंजूर करण्यात आली आहे. सदरहू जी.आर.नुसार राजमाता जिजाऊ जन्मस्थळ विकासासाठी ३ कोटी ३९ लाख रु. मंजूर झाले असून लवकरच कामांना सुरुवात होईल, असेही सांगण्यात आले आहे. उर्वरित निधीदेखील लवकरच प्राप्त होणार असल्याने विकास कामे पूर्ण होतील, असा विश्वास डॉ. शशिकांत खेडेकर यांनी व्यक्त केला आहे.