खासगी प्रवासी वाहनांचे ३० टक्क्याने भाडेवाढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:39 AM2021-08-13T04:39:17+5:302021-08-13T04:39:17+5:30
बुलडाणा : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका हा वाहतूक क्षेत्राला बसला आहे. या दरवाढीने खासगी प्रवासी वाहनांची ३५ ...
बुलडाणा : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका हा वाहतूक क्षेत्राला बसला आहे. या दरवाढीने खासगी प्रवासी वाहनांची ३५ टक्क्याने भाडेवाढ झाली आहे. त्यामुळे स्पेशल वाहन (जीप) करून बाहेरगावी जाणाऱ्यांचा प्रवास ही आता महागला आहे. पूर्वी स्पेशल वाहनासाठी १० रुपये प्रति किलोमीटरने भाडे आकारले जात होते, आता १४ रुपये एका किलोमीटरसाठी द्यावे लागत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने चांगलाच भडका घेतला आहे. त्यामुळे वाहतूक क्षेत्रातील भाडेवाढ करण्याशिवाय चालक व मालकांना पर्याय राहिला नाही. या इंधन दरवाढीची झळ ही प्रवाशी आणि वाहन मालक या दोघांनाही बसत आहे. १० ते १२ प्रवाशी घेऊन जाणाऱ्या जीपचे पूर्वी प्रतिकिलोमीटर १० रुपये भाडे आकारले जायाचे परंतु पेट्रोल, डिझेल महागल्यापासून या दरात प्रवाशी वाहतूक करणे परवडत नसल्याचे वाहन मालकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सध्या १० ते १२ प्रवाशी घेऊन जाणाऱ्या जीपचे १४ ते १५ रुपये प्रति किलोमीटरचे भाडे आकारले जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे वाहन मालकांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे.
गाडीचा हप्ता कसा भरणार?
अनेकांनी कर्ज काढून वाहन खरेदी केलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये अनेक दिवस नवीन वाहन घरासमोर उभे होते. तेव्हा कर्जाचा हप्ता भरणे वाहन चालकांसाठी अवघड झाले होते. त्यानंतर आता निर्बंध शिथिल झाले आहेत, मात्र पेट्रोल, डिझेलचे दर वाढविल्याने वाहन चालविणे परवडत नाही. त्यामुळे वाहनाचा हप्ता कसा भरावा, असा प्रश्न वाहन मालकांमधून उपस्थित होत आहे.
इंधन दरवाढीने गाडी वापरणे परवडेना
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने प्रवाशी वाहने चालविणे मोठे अवघड झाले आहे. दूरच्या प्रवासाठी गाडी भाड्याने नेण्यासाठी प्रवाशांना १३ ते १४ रुपये जास्त वाटतात, परंतु डिझेलचे दरच ऐवढे वाढलेले आहेत, की गाडी रोडवर आणणे परवडत नाही.
विष्णू देशमुख, चालक.
इंधन दरवाढीने प्रवाशी वाहतुकीचे दर वाढविण्याची वेळ आली आहे. आम्हाला सुद्धा कमी दरामध्ये परवडत नाही. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत सध्या ३० ते ३५ टक्क्याने भाडेवाढ झालेली आहे.
शरद धुपे, चालक.
मी खासगी प्रवाशी वाहतूक करतो. पूर्वी लोणी गवळी ते मेहकर २५ रुपये भाडे होते. परंतु आता ४० रुपये घ्यावे लागत आहेत. सध्या पेट्रोलचे वाढलेले दर बघता वाहन चालविणे परवडत नाही.
विठ्ठल सरकटे, चालक.
पेट्रोल: १०९.३२
डिझेल: ९७.४१