बुलडाणा जिल्ह्यातील ३१० कुपोषित बालकांना कोरोनाचा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:02 AM2020-04-13T11:02:21+5:302020-04-13T11:02:35+5:30
जिल्ह्यातील ३१० अतितीव्र कुपोषित बालकांना सध्या कोरोनाचा धोका अधिक आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : आपली रोग प्रतिकारक्षमता चांगली असेल, तर कोरोनाच नव्हे; कोणत्याही साथीच्या आजाराची भीती आपल्याला राहत नाही. रोग प्रतिकार क्षमता कमी असल्याने जिल्ह्यातील ३१० अतितीव्र कुपोषित बालकांना सध्या कोरोनाचा धोका अधिक आहे. संसर्गजन्य आजाराच्या काळात कुपोषित बालकांची विशेष काळजी घेण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
कोरोना विषाणुमुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण १७ मिळून आलेले आहेत. प्रतिकारशक्ती चांगली असेल, तर कोरोनाच्या विषाणूने विशेष फरक पडत नसल्याचे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून वैद्यकीय सुत्रांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी रोग प्रतिकारक्षमता वाढविण्याचा सल्लाही डॉक्टरांकडून दिल्या जात आहे. रोग प्रतिकार क्षमता कमी असलेल्यांमध्ये वयोवृद्ध, लहान मुलांचा समावेश असला तरी, कुपोषित बालकांमध्ये प्रतिकार क्षमतेची समस्या अधिक असते. जिल्ह्यात अतितीव्र कुपोषित (सॅम) बालकांची संख्या ३१९ आहे. मागील वर्षीपेक्षा यामध्ये १४२ ने वाढ झाली आहे. कुठलाही साथीचा आजार आल्यास कुपोषित बालकांना प्रतिकार क्षमता कमी असल्याने ते आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. कुपोषित बालकांच्या शरीरामध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव होण्याची भीती जास्त आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यास, तो प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो. त्यामुळे कुपोषित बालकांना कोरानापासून दूर ठेवण्यासाठी त्यांची विशेष काळजी घेण्याच्या सुचना जिल्हा परिषदच्या महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडूनही त्यांची विशेष तपासणी करणे गरजेचे आहे.
पोषण आहाराचे धान्य घरपोच
कुपोषित बालकांसाठी येणारे पोषण आहाराचे तांदूळ, डाळी, तेल यासह विविध प्रकारचे धान्य बालकांना घरपोच देण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्याचे धान्यही घरपोच दिले आहे. पुढील दोन महिन्याचे धान्य लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
कुपोषित बालकांमध्ये कुठलाही आजार लवकर बळावतो. कोरोनापासून बालकांची विशेष काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यांचा पोषण आहारही वितरीत करण्यात आला आहे. मुलांना बाहेर खेळ देऊ नये, कुटूंबाच्या बाहेरील व्यक्तींशी त्यांचा संपर्क येणार नाही, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
- अरविंद रामरामे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी,
महिला व बाल विकास विभाग, जि. प. बुलडाणा.