पोस्ट खात्यातील ३५६ कर्मचा-यांवर ‘बडतर्फची संक्रांत’
By admin | Published: January 24, 2017 02:33 AM2017-01-24T02:33:22+5:302017-01-24T02:33:22+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील २६ कर्मचा-यांचा समावेश; आंदोलनाचा दिला इशारा.
बुलडाणा, दि. २३- राज्यातील ३५६ युवकांना पोस्ट खात्यातील विविध पदांवर २0१६ मध्ये नोकरी देण्यात आली होती; मात्र अवघ्या सहा महिन्यांची सेवा दिल्यानंतर अचानक त्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती बडतर्फ कर्मचार्यांनी २३ जानेवारी रोजी बुलडाणा येथे दिली. या बडतर्फ कर्मचार्यांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २६ कर्मचार्यांचा समावेश आहे.
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालयाने २४ जानेवारी २0१५ रोजी कर्मचारी सरळ सेवा भरतीची जाहिरात काढली होती. महाराष्ट्र डाक विभागाने ठरविल्याप्रमाणे सर्व प्रक्रिया पार पाडून २९ मार्च २0१५ ला पोस्टमन व मेलगार्डच्या १ हजार ६८0 जागांसाठी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर ३ मे २0१५ रोजी एटीएस पदाच्या ७२५ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली. सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडून सदर परीक्षेचा अंतिम निकाल २१ मार्च २0१६ लावण्यात आला. त्यानंतर ठरावीक अंतराने विभागाने इंटरनेटवर जाहीर केलेल्या निवड यादीनुसार उमेदवारांना नियुक्तीपत्र पाठविले.
विभागाने ठरविल्यानुसार उमेदवारांच्या शालेय कागदपत्रांची तपासणी, वैद्यकीय तपासणी व पोलीस पडताळणी करून ३५६ उमेदवारांना ९ जून २0१६ पर्यंत कामावर रुजू करून घेण्यात आले. त्यामुळे उर्वरित २ हजार ७८ उमेदवारांना आठ महिने ताटकळत बसावे लागले. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथील पोस्टाच्या कार्यालयात या ३५६ कर्मचार्यांना बोलावून अचानक कामावरून काढून टाकण्यात आले. यासंदर्भात या कर्मचार्यांनी अधिकार्यांना कारण विचारले असता, त्यांना कुठलीच माहिती देण्यात आली नाही. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २६ कर्मचार्यांचा समावेश आहे, अशी माहिती पोस्टातील बडतर्फ कर्मचार्यांनी बुलडाणा येथे दिली.
पुन्हा सुशिक्षित बेरोजगारी
राज्यात सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हा ठपका पुसण्यासाठी राज्यभरातील युवकांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. केंद्रीय निवड पद्धतीने झालेल्या स्पर्धा परीक्षेत राज्यातील ३५६ उमेदवार उत्तीर्ण होऊन डाक विभागात नियुक्त झाले; मात्र काही महिने सेवा दिल्यानंतर ३५६ कर्मचार्यांना पोस्टाने अचानक काढून टाकल्याने या उमेदवारांसमोर पुन्हा सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्रीय निवड पद्धतीने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन मी पोस्टातील आरएनएस या पदावर मुंबई येथे रुजू झालो होतो; परंतु आम्हाला अचानक कुठलेही कारण न सांगता नोकरीवरून काढून टाकण्यात आले.
-स्वप्निल ठाकरे,
पोस्टातील बडतर्फ कर्मचारी, अमरावती.
स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन मी पोस्टातील एचओ या पदावर बुलडाणा येथे रुजू झाली होती. मी माझ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली असताना मला अचानक नोकरीवरून काढून टाकण्यात आले.
-तृप्ती सोनवणे,
पोस्टातील बडतर्फ कर्मचारी, बुलडाणा.