काेराेना काळात सेवा देणारे ३६ डाॅक्टर कार्यमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:37+5:302021-06-10T04:23:37+5:30
बुलडाणा : जिल्ह्यातील विविध प्राथमिक आराेग्य केंद्रांमध्ये काेराेना महामारीच्या काळात सेवा देणाऱ्या ३६ बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा खंडित करण्यात ...
बुलडाणा : जिल्ह्यातील विविध प्राथमिक आराेग्य केंद्रांमध्ये काेराेना महामारीच्या काळात सेवा देणाऱ्या ३६ बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे. या डाॅक्टरांना कार्यमुक्त करण्यात आले असून, त्यांच्या जागेवर एमबीबीएस डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. दाेन महिन्यांचे वेतनही मिळाले नसल्याने बीएएमएस डाॅक्टर सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
जिल्ह्यातील विविध प्राथमिक आराेग्य केंद्रांत एमबीबीएस डाॅक्टर मिळत नसल्याने बीएएमएस डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात आली हाेती. जिल्ह्यात गतवर्षी मार्च महिन्यापासून काेराेना संसर्ग सुरू झाला हाेता. या काळात कंत्राटी असलेल्या बीएएमएस डाॅक्टरांनी जीवाची पर्वा न करता सेवा दिली. यादरम्यान अनेक डाॅक्टरांना काेेराेनाचा संसर्ग झाला हाेता. काहींची प्रकृती गंभीर झाली हाेती, तरीही या डाॅक्टरांनी अविरत सेवा दिली. केंद्र शासनाने एमबीबीएस डाॅक्टरांना बंधपत्रित सेवा देणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे, प्रशासनाला आता एमबीबीएस डाॅक्टर उपलब्ध झाल्याने बीएएमएस डाॅक्टरांची सेवा खंडित करण्यात येत आहे. राज्यभरात हा प्रकार सुरू असल्याने बीएएमएस डाॅक्टरांच्या संघटनेने आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांना निवेदन दिले हाेते. या निवेदनाची दखल घेत टाेपे यांनी बीएएमएस डाॅक्टरांना कार्यमुक्त न करता त्यांना काेविड सेंटरवर नियुक्त करण्याचे आदेश दिले हाेते. मात्र, काेरेानाची दुसरी लाट ओसरत असल्याने काेविड सेंटरच बंद हाेत आहेत. त्यामुळे, या डाॅक्टरांचे काेविड सेंटरमध्ये समायाेजन अशक्य आहे.
दाेन महिन्यांचे वेतनही थकले
प्राथमिक आराेग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असताना मार्च आणि एप्रिल महिन्याचे वेतनही थकल्याने बीएएमएस डाॅक्टरांवर उपासमारीची वेळ आली आहे. काेराेनाच्या काळात या डाॅक्टरांचा राेजगार गेला आहे. त्यातच वेतनही मिळत नसल्याने बीएएमएस डाॅक्टरांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने दाेन महिन्यांचे थकीत वेतन द्यावे, अशी मागणी बीएएमएस डाॅक्टरांनी केली आहे.
काेराेना काळात जीवाची पर्वा न करता सेवा दिली. त्याची जाण ठेवत शासनाने आम्हाला सेवेत कायम करून घ्यावे. प्राथमिक आराेग्य केंद्रामध्ये जेथे आम्ही कार्यरत हाेताे तेथेच नियुक्ती द्यावी तसेच एमबीबीएस डाॅक्टरांची नियुक्ती जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांमध्ये करावी.
डाॅ. किशाेरकुमार बिबे, बुलडाणा
शासनाच्या आदेशानुसार एमबीबीएस डाॅक्टर उपलब्ध झाल्याने बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांचे रखडलेले वेतन येत्या चार ते पाच दिवसांत जमा करण्यात येणार आहे. एमबीबीएस डाॅक्टरांचा ११ महिन्यांचा करार असताे. त्यानंतर त्यांच्या जागा रिक्त हाेतात. या रिक्त झालेल्या जागांवर आधीच्या बीएएमएस डाॅक्टरांचीच नियुक्ती करण्यात येणार आहे.
डाॅ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आराेग्य अधिकारी, बुलडाणा