आठवीपर्यंतचे ३.६५ लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:36 AM2021-04-04T04:36:11+5:302021-04-04T04:36:11+5:30
कोरोनामुळे अर्थचक्र बिघडले असून, सर्वच क्षेत्र प्रभावित झाले असले तरी याचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. एक वर्षापासून ...
कोरोनामुळे अर्थचक्र बिघडले असून, सर्वच क्षेत्र प्रभावित झाले असले तरी याचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. एक वर्षापासून शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, कोणतीही परीक्षा न देता उत्तीर्ण होणार आहेत. गतवर्षी २३ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर झाले होते. मात्र, देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने १७ मार्च २०२० रोजी जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या. जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परीक्षा एप्रिल महिन्यात होतात. १७ मार्च रोजी शाळा बंद झाल्यामुळे गतवर्षी परीक्षा होऊ शकल्या नाहीत.
दरवर्षी जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात शाळा सुरू करण्यात येतात. मात्र, यादरम्यान कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. तर ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडण्यात आला. शिक्षकांनी पालकांना आवाहन करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. मात्र, जिल्ह्यात बहुतांश शाळा ग्रामीण भागात आहेत. तसेच शहरी भागातही पालकांकडे मोबाइलची व्यवस्था नसल्याने ऑनलाइन शिक्षणाचा फज्जा उडाला.
दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण कमी व्हायला लागले. त्यामुळे शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २० नोव्हेंबर २०२१ रोजी आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. पुन्हा शासनाने सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोन महिन्यानंतरच कोरोनाचे रुग्ण आणखी वाढू लागले. त्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या. आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा दोन महिने तर सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळा केवळ २० दिवस सुरू राहल्या. त्यानंतर शाळा बंद करण्यात आल्या असून, आता शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
गत एक वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांचे योग्य शिक्षण झाले नाही. त्यामुळे या शैक्षणिक वर्षाबाबत मुलांचे काय होईल, याबाबत चिंता सतावत होती. मात्र, विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने चिंता मिटली आहे.
- संजय म्हसाळ, पालक.
कोरोनामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून न निघणारे आहे. आता शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी अभ्यास करणार नाहीत. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यावरही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायला हव्या होत्या.
- प्रशांत राऊत, पालक.
शिक्षणमंत्र्यांनी १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्वीही होता. फक्त परीक्षा घेण्यात येत होत्या. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे परीक्षा होण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाणार नाही.
- अजय पांडे, पालक.
काय म्हणतात शिक्षणतज्ज्ञ
या शैक्षणिक वर्षात १ ते ४ पर्यंतच्या शाळा उघडल्याच नाहीत तसेच १ ते ८ पर्यंतच्या शाळा केवळ पंधरा दिवस सुरू होत्या. विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण ऑनलाइन देण्यात आले. सध्या कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा वातावरणात विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून परीक्षा घेणे योग्य नाही. पालकांचीही त्यासाठी संमती मिळाली नसती. कोरोना केव्हा संपेल याबाबत निश्चिती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे योग्यच आहे.
- एन.जे. फाळके, शिक्षणतज्ज्ञ.
शासनाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेणे योग्य नाही. दहावी व बारावीचे विद्यार्थीच ऑनलाइन परीक्षा घेण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे लहान मुलांना सध्याच्या वातावरणात शाळेत बोलावून परीक्षा घेणे योग्य नाही. शिक्षणमंत्र्यांनी हा निर्णय घेतला नसता तर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले असते.
- विजयकुमार शिंदे, शिक्षणतज्ज्ञ.