राज्यात रब्बीच्या ३७ टक्के पेरण्या!
By Admin | Published: November 18, 2014 11:57 PM2014-11-18T23:57:48+5:302014-11-18T23:57:48+5:30
जीवनदान परतीच्या पावसामुळे शेतक-यांना फायदा.
ब्रह्मनंद जाधव / मेहकर
राज्यात प्रदीर्घ दडीनंतर परतीचा पाऊस फिरकल्याने रब्बी हंगामातील पिकांना जीवनदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. राज्यात सरासरी २३ लाख ९ हजार ९१0 हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ३७ टक्के रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण झाली असून, त्यामध्ये गहू व हरभरा पिकाचा पेरा अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे.
खरीप हंगामात पावसाने दगा दिल्यामुळे शेतकर्यांना आर्थिक फटका बसला. तर विदर्भात सोयाबीन उत्पादक शेतकर्यांचा शेतीला लागलेला खर्चही भरून निघला नाही. खरीप हंगामातील झळ रब्बीत भरून काढण्यासाठी ओलिताची सोय असलेल्या शेतकर्यांची रब्बी पिकाची कामे जोमात सुरू आहेत; परंतु, कोरडवाहू क्षेत्रावरील शेतकरी अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत. राज्यात रब्बी हंगामाचे सरासरी ६२ लाख ४३ हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यातील सरासरी २३ लाख ९ हजार ९१0 हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ३७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये मक्याच्या सरासरी ९९ हजार ६00 हेक्टर क्षेत्रापैकी ६५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. शाळूचे सरासरी क्षेत्र ३0 लाख ९0 हजार असून, ४५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. हरभरा १३ लाख ६ हजार ८00 हेक्टर क्षेत्र असून, ३५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. गव्हाचे सरसरी क्षेत्र ११ लाख ७८ हजार ६00 असून, १0 टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. तर भाजीपाला, भुईमूग, सूर्यफूल, करडी, जवस, वाटाणा व इतर पिकांचे सरासरी ६ लाख ६७ हजार ६00 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ २ लाख ७९ हजार ४३0 हेक्टर क्षेत्रावर भाजीपाल्यासह इतर पेरणी झाली आहे. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे लांबलेला खरीप हंगाम व परतीच्या पावसाअभावी रब्बीच्या पेरणीवर विपरीत परिणाम झाला आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीला अनेक शेतकर्यांनी पेरणी करण्याचे धाडसच केले नव्हते; परंतु गत तीन ते चार दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी परतीचा पाऊस फिरकल्याणे शेतकर्यांमध्ये आता रब्बी हंगामाची आशा निर्माण झाली आहे. तर बहुतांश ठिकाणी या परतीच्या पावसामुळे शेतकर्यांनी रब्बी हंगामाच्या पेरणीला जोमात सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.