मनरेगा अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात ३९५ शेततळी
By Admin | Published: January 26, 2016 02:28 AM2016-01-26T02:28:10+5:302016-01-26T02:28:10+5:30
६७ शेततळय़ांचे काम पूर्ण; १९७ शेततळय़ांचे काम प्रगतिपथावर.
हर्षनंदन वाघ / बुलडाणा: शेतीला उपयुक्त पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने जलस्रोत वाढविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ३९५ शेततळी मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी ६७ शेततळी पूर्ण झाली असून, १९७ शेततळ्यांचे काम सुरू आहे. उर्वरित १३१ शेततळ्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या योजनेमुळे परिसरात असलेल्या गावांतील मजुरांना रोजगार उपलब्ध झाला असून, आतापर्यंत १३७.२१ लाखांचा खर्च यावर करण्यात आला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी शेतकर्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पेरणीच्या सुरुवातीला पावसाने दगा दिला होता. त्यामुळे पेरणी वेळेवर न झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट आली. यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे शेतकर्यांना शेततळी घेण्यासाठी प्रोत्साहन देणे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीने किमान पाच शेततळी घेण्याचा सूचना दिल्या आहेत. १0 बाय १0 बाय ३ मीटर, १५ बाय १0 बाय ३ मीटर तसेच १५ बाय १५ बाय ३ मीटर या आकाराचे शेततळे ग्रामपंचायतमार्फत घेण्याची परवानगी शासननिर्णयानुसार देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायत अंतर्गत सन २0१५-१६ या वर्षासाठी ३९५ शेततळी मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी ६७ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून, १९७ शेततळ्यांचे काम सुरू आहे. यासाठी आतापर्यंत १३७ लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. या शेततळ्यांमुळे अल्पभूधारक शेतकर्यांना फायदा झाला आहे.