भगर, आमटीमधून ४०० जणांना विषबाधा; सोमठाणा येथील घटना

By निलेश जोशी | Published: February 21, 2024 12:57 PM2024-02-21T12:57:10+5:302024-02-21T13:13:12+5:30

धार्मिक कार्यक्रमादरम्यानची घटना

400 people poisoned from Bhagar, Amati Incident in Khaparkhed, Somthana: Incident during a religious event | भगर, आमटीमधून ४०० जणांना विषबाधा; सोमठाणा येथील घटना

भगर, आमटीमधून ४०० जणांना विषबाधा; सोमठाणा येथील घटना

बीबी (जि. बुलढाणा): लोणार तालुक्यातील खापरखेड, सोमठाणा येथे येथे सप्हातानिमित्त करण्यात आलेल्या भगर, आमटीच्या प्रसादातून सुमारे ४०० जणांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी (दि. २०) मध्यरात्री घडली. दरम्यान रुग्णांवर बिबी, लोणार आणि मेहकर येथील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. वर्तमान स्थितीत रुग्णांची प्रकृती स्थीर असून काहींना रुग्णालयातून सुट्टीही देण्यात आली आहे.

लोणार तालुक्यातील सोमठाणा येथील भगवान नाडे यांच्या शेतातील मंदिरामध्ये १४ फेब्रुवारीपासून सप्ताह सुरू होता. सप्ताहाच्या सातव्या दिवशी एकादशी असल्याने भाविकांसाठी भगर, आमटीचा प्रसाद तयार करम्यात आला होता. मात्र हा प्रसाद खाल्ल्यामुळे सोमठाणा आणि खापरखेड येथील काही महिला व पुरुषांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवि्यात आले. तेथे डॉक्टरच उपलब्ध नसल्याने खासगी प्रॅक्टीस करण्यात आलेल्या डॉक्टरांना बोलावण्यात आले. रुग्णांची वाढती संख्या पहता रुग्णालयाच्या आवारातच ताडपत्री टाकून झाडाला दोरी बांधून रुग्णांना सलाईन देत उपचार सुरू करण्यात आले.

परिस्थिती नियंत्रणात
सोमठाणा येथे झालेल्या विषबाधेची परिस्थिती नियंत्रणात आहे. यातील विषबाधा झालेल्या सुमारे १०२ जणांवर बीबी, लोणार ग्रामीण रुग्णालय आणि मेहकर येथे उपचार करण्यात आले. यातील सर्व जणांना कोणताही धोका नसल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच वयोवृद्धांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

सोमठाणा येथे विषबाधा झालेल्या नागरिकांवर बीबी येथे १४२, मेहकर येथे ३५ आणि लोणार ग्रामीण रुग्णालयात १५ अशा एकूण १९२ नागरिकांवर उपचार करण्यात आले. विषबाधा झालेल्या नागरिकांची संख्या अधिक असल्याने ग्रामीण रुग्णालयात असलेल्या डॉक्टरांसह खासगी डॉक्टरांचीही या आपत्कालीन परिस्थितीत मदत घेण्यात आली. याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने विषबाधा झालेल्या अन्नाचे नमुने घेतले आहे. या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आणि डॉक्टरांच्या पथकाने भेट दिली. नागरिकांच्या वैद्यकीय सोयीसाठी दिवसभर वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे.

Web Title: 400 people poisoned from Bhagar, Amati Incident in Khaparkhed, Somthana: Incident during a religious event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.