नदीकाठावरील ४४ गावांना पाणीटंचाईचे चटके, धरणाचे पाणी नदीपात्रात न साेडल्याने भीषण पाणीटंचाई
By संदीप वानखेडे | Published: April 9, 2023 03:47 PM2023-04-09T15:47:15+5:302023-04-09T15:49:12+5:30
संत चाेखासागर प्रकल्पातून खडकपूर्णा नदीपात्रात पाणी साेडण्यात आले नसल्याने नदीकाठावरील ४४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
संदीप वानखडे, दुसरबीड : संत चाेखासागर प्रकल्पातून खडकपूर्णा नदीपात्रात पाणी साेडण्यात आले नसल्याने नदीकाठावरील ४४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांना एप्रिल महिन्यातच पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. ग्रामपंचायतींकडे माेठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने धरणाचे पाणी साेडण्यात आले नसल्याचे हे चित्र आहे.
वाढते तापमान, वातावरणातील बदल यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील २६ गावांसह एकूणच खडकपूर्णा नदी काठावरील ४४ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या संत चोखासागर धरणातील पाणी खडकपूर्णा नदीपात्रात साेडण्यात आले नाही़. त्यामुळे या गावांना एप्रिल महिन्याच्या तोंडावरच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सणासुदीच्या काळात लोक पाणीटंचाईने हैराण झाले आहेत. संत चोखासागर प्रकल्पाचे आरक्षित अपेक्षित पाण्याची पाणीपट्टी संबंधित ग्रामपंचायतींनी भरलीच नसल्याने नदीपात्रातून पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाला प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सुरुवातीपासून एवढी पाणीटंचाई तर पुढे काय असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"