मलकापूर-बुलडाणा ४५ किमीच्या प्रवासासाठी लागले पावणेदोन तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 12:04 PM2021-06-27T12:04:37+5:302021-06-27T12:04:45+5:30
The 45 km journey from Malkapur to Buldana : ही बस मलकापूर बसस्थानकावरून शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास निघाली आणि दुपारी २ वाजून ४१ मिनिटांनी बुलडाणा येथे पोहोचली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मलकापूर-बुलडाणा हे ४५ किमी अंतर कापण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा आगाराच्या बसला तब्बल पावणे दोन तास लागल्याचा प्रकार २६ जून रोजी समोर आला. खास्ता हालत असलेली बस तर पाच किमी लांबीच्या राजूर घाटात दोनदा थबकली. चढामध्ये बसला वेगच घेता येत नव्हता. सुदैवाने घाटात अपघात झाला नाही.
या संपूर्ण प्रकारामुळे मात्र बसमधील प्रवासी संतापले होते. बुलडाणा आगाराच्या एमेच-०६ एस-८९६४ क्रमांकाच्या बससंदर्भातील ही घटना आहे. ही बस मलकापूर बसस्थानकावरून शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास निघाली आणि दुपारी २ वाजून ४१ मिनिटांनी बुलडाणा येथे पोहोचली. या बसच्या मागून निघालेल्या अनेक बसेस तर सोडा ॲपेरीक्षा सुद्धा या बसला अेाव्हरटेक करत पुढे जात होत्या. बसमध्ये असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे बस वेगच घेत नव्हती. समुद्र सपाटीपासून २ हजार १९० फूट उंचीवर असलेल्या बुलडाणा शहरालगतच्या राजूर घाटानेतर या खस्ता हालत असलेल्या बसची सत्वपरीक्षाच पाहिली. घाटात दोनदा ही बस थांबली. हा घाट ही बस चढेल की नाही इतपत स्थिती निर्माण झाली होती. प्रवाशांचे दैव बलवत्तर आणि चालकाचे कसब याच्या जोरावर कशीबशी ही बस घाट चढून बुलडाणा बसस्थानकात पोहोचली.
तेव्हा बसमधील एका प्रवाशाने बसच्या स्थितीसंदर्भात आगार प्रमुख मोरे यांना फोनवर कल्पना दिली पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याबाबत विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
तक्रार पुस्तिकेची शोधाशोध
बुलडाणा आगारात बस पोहोचल्यानंतर एका प्रवाशाने नियंत्रण कक्षात तक्रार पुस्तिकेची मागणी केली. त्यावर तेथे १५ मिनिटे तक्रार पुस्तिकेची शोधाशोध करण्यात आली. मात्र त्यानंतरही संबंधित प्रवाशास तक्रार पुस्तिका उपलब्ध करून दिल्या गेली नाही. शेवटी संबंधित प्रवासी पुन्हा सायंकाळी सात वाजता बसस्थानकात पोहोचल व त्यांनी तक्रार पुस्तिका पाठपुरावा करून घेतली आणि त्यात तक्रारही नोंद केली आहे.