४५ किमीच्या प्रवासासाठी लागले पावणेदोन तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:22 AM2021-06-27T04:22:46+5:302021-06-27T04:22:46+5:30

या संपूर्ण प्रकारामुळे मात्र बसमधील प्रवासी संतापले होते. बुलडाणा आगाराच्या एमेच-०६ एस-८९६४ क्रमांकाच्या बससंदर्भातील ही घटना आहे. ही बस ...

The 45 km journey took two and a half hours | ४५ किमीच्या प्रवासासाठी लागले पावणेदोन तास

४५ किमीच्या प्रवासासाठी लागले पावणेदोन तास

Next

या संपूर्ण प्रकारामुळे मात्र बसमधील प्रवासी संतापले होते. बुलडाणा आगाराच्या एमेच-०६ एस-८९६४ क्रमांकाच्या बससंदर्भातील ही घटना आहे. ही बस मलकापूर बसस्थानकावरून शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास निघाली आणि दुपारी २ वाजून ४१ मिनिटांनी बुलडाणा येथे पोहोचली. या बसच्या मागून निघालेल्या अनेक बसेस तर सोडा ॲपेरीक्षा सुद्धा या बसला अेाव्हरटेक करत पुढे जात होत्या. बसमध्ये असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे बस वेगच घेत नव्हती. त्यातच समुद्र सपाटीपासून २ हजार १९० फूट उंचीवर असलेल्या बुलडाणा शहरालगतच्या राजूर घाटानेतर या खस्ता हालत असलेल्या बसची सत्वपरीक्षाच पाहिली. घाटात दोनदा ही बस थांबली. हा घाट ही बस चढेल की नाही इतपत स्थिती निर्माण झाली होती. अशा स्थितीत प्रसंगी घाटात अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. मात्र प्रवाशांचे दैव बलवत्तर आणि चालकाचे कसब याच्या जोरावर कशीबशी ही बस घाट चढून बुलडाणा बसस्थानकात पोहोचली.

सुखकर व सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसलाच सामान्य नागरिक प्राधान्य देतात. मात्र २६ जून रोजीच्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये प्रचंड संताप होता.

कशीबसी बस चालकाने बुलडाणा बसस्थानकात आणली तेव्हा बसमधील एका प्रवाशाने बसच्या स्थितीसंदर्भात आगार प्रमुख मोरे यांना फोनवर संपूर्ण प्रकार सांगितला व प्रवाशांच्या जिवाशी असे खेळू नका याबाबत सांगितले असता या प्रवाशाच्या मुद्द्याला बगल देण्यात आली. या संपूर्ण प्रकाराबाबत विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. विशेष म्हणजे गेल्या चार ते पाच दिवसा अगोदर एसटीच्या चार ते पाच कर्मचाऱ्यांनी ब्रेक निकामी झालेली एक बस संपूर्ण रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना पदोपदी दूर राहण्याचे सांगत बुलडाणा आगारात पोहोचवली होती.

--तक्रार पुस्तिकेची शोधाशोध--

बुलडाणा आगारात बस पोहोचल्यानंतर एका प्रवाशाने नियंत्रण कक्षात तक्रार पुस्तिकेची मागणी केली. त्यावर तेथे १५ मिनिटे तक्रार पुस्तिकेची शोधाशोध करण्यात आली. मात्र त्यानंतरही संबंधित प्रवाशास तक्रार पुस्तिका उपलब्ध करून दिल्या गेली नाही. शेवटी संबंधित प्रवासी पुन्हा सायंकाळी सात वाजता बसस्थानकात पोहोचल व त्यांनी तक्रार पुस्तिका पाठपुरावा करून घेतली आणि त्यात तक्रारही नोंद केली आहे.

Web Title: The 45 km journey took two and a half hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.