खामगावातून ४५ परप्रांतीय मजूरांना दोन बसेसद्वारे सोडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 04:55 PM2020-05-11T16:55:09+5:302020-05-11T16:56:40+5:30
संचारबंदीत अडलेल्या ४५ मजुरांना सोमवारी दुपारी खामगाव येथून दोन विशेष बसेसद्वारे सोडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना संचारबंदीत अडलेल्या ४५ मजुरांना सोमवारी दुपारी खामगाव येथून दोन विशेष बसेसद्वारे सोडण्यात आले. नाशिक येथे स्थलांतरीत मजूर असलेले ओरीसा आणि उत्तरप्रदेशातील ४५ मजूर रविवारी रात्री खामगावातून पायी जात होते. शहर पोलिस स्टेशनसमोर सुरू असलेल्या तपासणी दरम्यान, या मजुरांना खामगावात थांबविण्यात आले. त्यानंतर या मजुरांना सोमवारी दुपारी त्यांच्या गावी रवाना करण्यात आले.
कोरोना संचारबंदीमुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक कारखाने बंद पडलेत. बांधकामेही बंद पडल्याने गत महिना-दीड महिनाभरापासून या मजुरांचे हाल होत आहेत. नजीकच्या काळात रोजगार उपलब्ध होण्याची आशा धुसर झाल्याने गत आठ दिवसांपूर्वी ४५ मजूर आपल्या चिल्यांपिल्यांसह नाशिक येथून पायी निघाले. रविवारी खामगावात रात्री अवकाळी पाऊस सुरू असताना शहर पोलिस स्टेशन समोर या मजुरांना पोलिसांनी थांबविले. त्यांची चौकशी केल्यानंतर ते पायी ओरीसाकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले असता, शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर यांनी आपल्या पथकाच्या मदतीने या मजुरांची बसस्थानकात राहण्याची व्यवस्था केली. शहरातील एका सामाजिक संस्थेच्यावतीने या मजुरांची रात्रीच्या आणि सकाळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर महसूल प्रशासनाच्या सहकार्याने या मजुरांना पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. या मजुरांना सोडण्यासाठी दोन बसेसची व्यवस्था करण्यात आली. उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार शीतल रसाळ, शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर, स्थानक प्रमुख रामकृष्ण पवार यांच्या उपस्थितीत सोडण्यात आले. महाराष्ट्रातील औसापर्यंत या मजुरांना सोडण्यात येणार असल्याचे समजते.
लहानग्याच्या सायकलीचाही ‘एसटी’तून प्रवास!
नाशिक येथून ३७२ कि.मी. पायी प्रवास करीत खामगावात आलेल्या एका मजुराने आपल्या मुलांना त्यांच्या सायकलीने आणले होते. दरम्यान, मजुरांना बसमधून सोडताना सायकल बसमध्ये ठेवण्यास चालक-वाहकाने नकार दिला. त्यावेळी या मजुराने सायकल विक्री करण्याचे ठरविले. बसस्थानकातील काहींनी सायकल विक्रीचा सौदाही केला. त्यावेळी या मजुराच्या मुलाच्या डोळ्यात अश्रृ तरळले. ही बाब निरिक्षक सुनिल अंबुलकर यांच्या निर्दशनास येताच, त्यांनी त्या मजुराला सायकल बसमधून नेण्यास अनुमती दिली.
नाशिक येथून पायी आलेल्या ४५ मजुरांना पावसामुळे रात्री खामगाव येथे मुक्कामी ठेवले. सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. महसूल प्रशासनाच्या मदतीने या मजुरांना दोन बसेसच्या माध्यमातून दुपारी खामगावातून सोडण्यात आले.
-सुनिल अंबुलकर
निरिक्षक, खामगाव शहर.