४.५० लाख अल्पभूधारकांचे १ हजार ४० कोटींचे पीक कर्ज माफ
By admin | Published: June 13, 2017 12:19 AM2017-06-13T00:19:45+5:302017-06-13T00:19:45+5:30
पेरणीसाठी शेतकऱ्यांना तत्काळ पैशांची गरज : बँकांचा नकार
विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असल्याची घोषणा केली. त्यानुसार जिल्ह्यातील ४ लाख ५२ हजार ८७८ अल्पभूधारक शेतकऱ्यांचे १ हजार ४० कोटींचे पीक कर्ज माफ होणार आहे. मात्र, अद्याप शासनाचे कोणतेही दिशानिर्देश आले नसल्यामुळे बँकेचे अधिकारी कर्जमाफी कशी द्यायची, याबाबत संभ्रमात आहेत.
गत सहा महिन्यांपासून जिल्ह्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह विविध पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. काँग्रेसने संघर्ष यात्रा काढली, तर त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्राही काढली. संपूर्ण राज्यात विविध पक्षांच्यावतीने कर्जमाफीची मागणी करण्यात आली. त्यानंतर शेतकरी संपावर गेले. या सर्वांची फलश्रुती कर्जमाफीत झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज तातडीने माफ करण्याची घोषणा केली. जिल्ह्यात एकूण शेतकऱ्यांची संख्या ५ लाख ६३ हजार १३८ असून, यापैकी ४ लाख ५२ हजार ८७८ शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख १५ हजार १०५ शेतकऱ्यांकडे १२९० कोटी रुपयांचे कर्ज आहे. यापैकी अत्यल्प भूधारक १ लाख १३ हजार ८४४ शेतकऱ्यांकडे ४३० कोटी, अल्पभूधारक ८२ हजार ४०३ शेतकऱ्यांकडे ६१० कोटी रुपये, तर अन्य २ लाख ८५८ शेतकऱ्यांकडे २४९ कोटींचे पीककर्ज आहे. शासनाने सध्या केलेल्या घोषणेनुसार जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार २४७ अल्पभूधारक शेतकऱ्यांचे १ हजार ४० कोटींचे कर्ज माफ होणार आहे. सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याच्या विचारात असून, सरसकट पीक कर्जमाफी झाली, तर २ लाख १७ हजार १०५ शेतकऱ्यांचे १२९० कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेती असून, गत चार-पाच वर्षांपासून चांगले उत्पन्न झाले नाही. यावेळी उत्पन्न झाले, तर भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
बँकांकडे रक्कम प्राप्त झाल्याशिवाय नवीन कर्ज नाही!
कर्जमाफी झाल्यामुळे शेतकरी बँकांकडे नवीन पीक कर्जाची मागणी करीत आहेत. मात्र, अधिकारी शेतकऱ्यांना परत पाठवित आहेत. जोपर्यंत शासन बँकांकडे शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जाची रक्कम जमा करणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळणार नाही. शासनाने केवळ रविवारी घोषणा केली असून, त्याबाबत अजून कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.
बँकांना दिशा निर्देशाची वाट
कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असली, तरी अद्याप याबाबत कोणत्याही प्रकारचा अध्यादेश शासनाने काढला नाही. तसेच बँकांना कोणतेही दिशा निर्देशही दिले नाहीत. त्यामुळे कर्जमाफी कशी द्यायची, कुणाला द्यायची, याबाबत बँकेचे अधिकारी संभ्रमात आहेत. शेतकरी बँकेत जाऊन कर्जमाफीबाबत विचारपूस करीत आहेत. मात्र, अद्याप आदेश आले नसल्यामुळे अधिकारी आदेशाची वाट पाहत आहेत.