४.५० लाख क्विंटल तुरीचे मोजमाप बाकीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2017 12:08 AM2017-06-01T00:08:58+5:302017-06-01T00:08:58+5:30

जिल्ह्यातील केंद्रांवर मोजणीच्या प्रतीक्षेत असलेली तूर क्विंटलमध्ये

4.50 lakh quintals pinnacle measurements! | ४.५० लाख क्विंटल तुरीचे मोजमाप बाकीच!

४.५० लाख क्विंटल तुरीचे मोजमाप बाकीच!

Next

गिरीश राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शेतकऱ्यांकडील तुरीचा शेवटचा दाणा खरेदी करण्याचे आश्वासन शासनाकडून दिले जात असताना, अद्यापही १० हजारांच्यावर शेतकऱ्यांची ४.५० लाख क्विंटलच्यावर तुरीचे मोजमाप बाकी आहे. याआधी तूर खरेदीला चार वेळा मुदतवाढ व आता पुन्हा ३१ मे नोंदणीची शेवटची दिनांक, यामुळे तूर विक्री केव्हा होईल व होईल की नाही, अशी संभ्रमावस्था शेतकऱ्यांमध्ये कायम आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून अवर्षण दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी झाले. मात्र, तुरीचे भाव सुरुवातीपासून चार हजारांच्या आत असल्याने यावर्षी शासनाच्या हमीदर केंद्रावर तूर विक्रीसाठी रांगा लागल्या. यामुळे कधी बारदानाचा अभाव, कधी मोजमापाची संथ गती, झालेली मोठी आवक यामुळे निर्धारित तारखेपर्यंत या केंद्रावर आलेल्या तुरीचे मोजमाप न झाल्याने चार वेळा मुदतवाढ द्यावी लागली. तरी देखील तुरीचे मोजमाप न झाल्याने शेतकऱ्यांना केंद्रांवर करावा लागणारा मुक्काम व वाहन खुटीचा भुर्दंड तसेच येणारे पावसाचे दिवस पाहता नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना तूर नोंदणी करावी लागली आहे. नोंदणीनंतर शेतकऱ्यांची तूर खरेदी केव्हा होईल, हे आदल्या दिवशी कळविल्या जात आहे. मात्र ३१ मे या अखेरच्या दिनांकापर्यंत जिल्ह्यातील १३ ठिकाणी तालुका स्तरावर सुरू असलेल्या केंद्रांवर शेकडो शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. ३१ मे या नोंदणीच्या अखेरदिवशी अशा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा आकडा १० हजारांच्या वर आहे. या अंदाजानुसार अद्याप साडेचार लाख क्विंटलच्या वर तुरीचे मोजमाप प्रतीक्षेत आहे. दरम्यान, येणाऱ्या पावसाच्या दिवसांत शेतकऱ्यांची तूर बाजारात बोलविण्यात आली नसली, तरी हमीदरावर खरेदी केलेल्या तुरीचे सुद्धा नुकसान संभावित आहे. तेव्हा पेरणीचे दिवसाअगोदर सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे हे आव्हान बनले आहे.

दीड महिना उलटूनही चुकारे नाहीत!
- एकूणच शेतकऱ्यांची अवस्था ‘आई जेवू घालीना व बाप भीक मागू देई ना’ अशी झाली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने खुल्या बाजारातील चार हजारांचे खाली असलेल्या भावात तूर विकणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. शेवटी कोणीही असो दोन पैसे जादा मिळविण्याची गरज प्रत्येकालाच असते.
- दुसरीकडे शासनाच्या हमीदर केंद्रावर शेतकऱ्यांना दिलासा मिळत असताना उशीरा होणारे मोजमाप व संभ्रमावस्था, महिना दीड महिना उलटूनही न मिळणारा चुकारा व पैशाची अत्यंत निकड, यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल खचत आहे.
- खामगाव शहरातील हमीदर केंद्रावर विदर्भ मार्केटिंग को-आॅप. फेडरेशनला विक्री केलेल्या तुरीचे चुकारे आजरोजी १८ एप्रिलपर्यंतचे आलेले आहेत. त्यानंतर तूर विकलेल्या शेतकऱ्यांना दीड महिना उलटूनही चुकारे मिळाले नाहीत. येणारे पेरणीचे दिवस लक्षात घेता यावर तातडीने अंमलबजावणी होत चुकारे मिळण्याची मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: 4.50 lakh quintals pinnacle measurements!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.