बुलडाणा जिल्ह्यात अडकलेल्या ४,५०० मेंढपाळांची परवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 12:05 PM2020-05-16T12:05:20+5:302020-05-16T12:05:27+5:30

जवळची सर्वच संसाधन संपल्याने मेंढपाळांसह अडकून पडलेल्या मेंढ्यांचेही हाल होत आहे.

4,500 shepherds stranded in Buldana district! | बुलडाणा जिल्ह्यात अडकलेल्या ४,५०० मेंढपाळांची परवड!

बुलडाणा जिल्ह्यात अडकलेल्या ४,५०० मेंढपाळांची परवड!

Next

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोरोना विषाणू संक्रमनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील साडेचार हजारावर मेंढपाळ जंगलात अडकून पडले आहेत. जंगलात आणि उलंगवाडी झालेल्या शेतात चराईसाठी मेंढ्या घेऊन गेलेल्या मेंढपाळांची चांगलीच परवड होत आहे. जवळची सर्वच संसाधन संपल्याने मेंढपाळांसह अडकून पडलेल्या मेंढ्यांचेही हाल होत आहे.
कोरोना विषाणू संक्रमनामुळे जगभर हाहाकार माजविला आहे. कोरोना विषाणू संक्रमनानंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील स्थलांतरीत मजूर आणि सामान्य नागरिकांची परवड होत आहे. राज्यातील अनेक स्थलांतरीत मजूर अद्यापही नाशिक, पुणे, मुंबई, अहमदनगर यासह विविध राज्यात अडकून पडले आहेत. त्याचवेळी राज्यातील मेंढपाळांचीही या विषाणू संक्रमणामुळे चांगलीच परवड होत आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील तब्बल साडेचार हजारावर मेंढपाळ बुलडाणा जिल्ह्यासह नजीकच्या जिल्ह्यात गत दोन महिन्यांपासून अडकून पडले आहेत. त्यांच्याजवळची संसाधन संपली आहेत. त्यामुळे जंगलातच अनेकांची उपासमार सुरू आहे. मेंढपाळासोबतच जंगलात चराईसाठी गेलेल्या मेंढ्या आणि इतर जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मेंढपाळांना आहे तिथे धान्य मिळावे!
कोरोना संचारबंदीमुळे अडकलेल्या मेंढपाळांना त्यांच्या जवळील रेशन कार्ड अथवा आधारकार्डावर धान्य स्वस्त: धान्य दुकानदारांकडून मिळावे. मेंढपाळाजवळील सर्वच संसाधन संपल्याने जंगलात अडकलेल्या मेंढपाळांची आणि मेंढ्यांचे चांगलेच हाल होत असल्याचे जंगलात अडकलेले मेंढपाळ तानाजी शिंगाडे यांनी सांगितले.

शेतातील पिके निघाल्यानंतर जिल्ह्यातील मेंढपाळ चराईसाठी आपल्या मेंढ्या घेऊन जातात. परंपरेनुसार मेंढपाळ चराईसाठी निघालेत. मात्र, कोरोना संचारबंदीमुळे अडकून पडलेत. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यात सुमारे साडेचार हजाराच्यावर मेंढपाळ आहेत.
- महादेव हटकर
हिवरखेड ता. खामगाव, जि.बुलडाणा.

 

Web Title: 4,500 shepherds stranded in Buldana district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.