पूर्णा नदीच्या पात्रात बुडाल्याने ४६ वर्षीय इसमाचा मृत्यू
By विवेक चांदुरकर | Published: June 20, 2024 04:33 PM2024-06-20T16:33:21+5:302024-06-20T16:33:49+5:30
शेतात पाणी देण्यासाठी मंगळवारी रात्री इलेक्ट्रिक मशिन सुरू करताना पाय घसरून पडल्याने नदीच्या पात्रात बुडाल्याची माहिती आहे.
मलकापूर : तालुक्यातील वाघोळा शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात बुडाल्याने ४६ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. शेतात पाणी देण्यासाठी मंगळवारी रात्री इलेक्ट्रिक मशीन सुरू करताना पाय घसरून पडल्याने नदीच्या पात्रात बुडाल्याची माहिती आहे.
कांतीलाल काशिनाथ पाचपोळ (४६, रा. वाघोळा ता.मलकापूर) हे मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास जुने गावठाणातील शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. उशिरा रात्रीपर्यंत घरी परतले नाही. त्यामुळे घरच्यांनी त्यांची चोहीकडे शोधाशोध केली. परंतु ते आढळून आले नाही. बुधवारी पूर्णा नदीच्या काठावर कांतीलाल काशीनाथ पाचपोळ यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन स्थळ पंचनामा केला. शेतात विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारीचे बटन दाबताना पाय घसरून ते नदीच्या पात्रात बुडाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेत एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मनमिळावू व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.