जि.प.शाळेची ४६५ पदे रिक्त : नवीन शिक्षक भरती बंद

By Admin | Published: May 17, 2017 07:44 PM2017-05-17T19:44:53+5:302017-05-17T19:44:53+5:30

ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!

465 vacancies of ZP School vacant: Recruitment of new teachers stopped | जि.प.शाळेची ४६५ पदे रिक्त : नवीन शिक्षक भरती बंद

जि.प.शाळेची ४६५ पदे रिक्त : नवीन शिक्षक भरती बंद

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

हर्षनंदन वाघ /बुलडाणा

शासनाच्या आदेशान्वये नवीन शिक्षक भरती बंद असल्यामुळे व सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढल्याने जिल्ह्यात
जिल्हा परिषदेच्या जवळपास ४६५  जागा रिक्त आहेत. त्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक सत्रात असंख्य शिक्षकांवर अतिरिक्त भार राहणार असून शासनाच्या नवीन धोरणानुसार बदल्या झाल्यास दुर्गम व अवघड क्षेत्रातील शाळा शिक्षकांविना राहणार आहेत.

जिल्ह्यात येणाऱ्या जून महिन्यापासून शाळेच्या नवीन सत्राला सुरूवात होणार आहे. त्या दृष्टीकोनातून जिल्हा परिषदेतील शाळांनी तयारी सुरू केली आहे.मात्र, यापूर्वी असलेला माहोल सध्या दिसून येत नाही. शासनाने नवीन धोरणानुसार बदल्या करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे सर्वच शिक्षक धास्तावलेले आहेत. यापूर्वी बदली होणार नसल्यामुळे अनेक शिक्षक नवीन शैक्षणिक सत्राची तयारी करण्यासाठी सुटीतही शाळेवर जात होते. अनेक शिक्षकांनी शाळा डिजीटल करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. मात्र आता बदली कोठे होणार ? या विवंचनेत शिक्षक मंडळी दिसून येत आहेत. त्यात नवीन धोरणानुसार तिन वर्ष सेवा दिलेल्या दुर्गम व अवघड क्षेत्रातील शिक्षक कोठेही बदली मागणार असल्यमुळे त्या ठिकाणाच्या शिक्षकांची बदली इतर ठिकाणी होणे क्रमप्राप्त आहे. मात्र मंजूर पदापेक्षा कार्यरत शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी असल्यामुळे दुर्गम व अवघड क्षेत्रातील शाळा शिक्षकांविना राहण्याची भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे ज्या शाळेतील शिक्षकांची पदे रिक्त राहतील त्या शाळेवरील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे. जिल्ह्यात आज रोजी १३ पंचायत समितीअंतर्गंत ६ हजार ९६३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६ हजार ४९८ कार्यरत पदे असल्यामुळे ४६५ शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे दिसून येते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान
कॉन्व्हेट संस्कृती रूजल्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. त्यात काही शिक्षकांनी डिजीटल शाळा करून विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत वळविण्यात यश आले होते. मात्र नवीन धोरणानुसार सर्वच शिक्षकांच्या बदल्या होणार असल्यामुळे अतिरिक्त परिश्रम घेण्यापासून शिक्षक दूर जात आहे. तर शिक्षकांची ४६५ पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक उलब्ध नसल्याने अनेक शिक्षकांवर अतिरिक्त भार येणार आहे. अशा अतिरिक्त कामामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देऊ शकत शकत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे. अशीच परिस्थिती उर्दू शाळेबाबत होणार आहे.

अवघड शाळेला शिक्षक मिळणे कठिण
शासनाच्या नवीन धोरणानुसार अवघड शाळेवरील शिक्षकाला तिन वर्षानंतर कोणत्याही शाळेवर बदली मागण्याचा हक्क मिळणार आहे. त्यामुळे त्या शाळेवरील शिक्षकाची बदली क्रमप्राप्त आहे. तसेच बदली धोरणानुसार सर्वात शेवटी अवघड क्षेत्रातील शाळेवरील शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. मात्र जिल्ह्यात शिक्षकांची ४६५ पदे रिक्त असल्यामुळे जिल्ह्यातील अवघड शाळेला शिक्षक मिळेल की नाही ? याबाबत शंका व्यक्त होत आहे.

खाजगी शाळांची चांदी
जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिक्षकांची पदे पुरेशा प्रमाणात नसल्याने अनेक शिक्षकांवर अतिरिक्त भार येणार आहे. त्याचाच परिणाम म्हणून अतिरिक्त कामाचा बोज्यामुळे शिक्षकांच्या शिकविण्याच्या पध्दतीत बदल होत आहे. त्यामुळे पालकांनी मराठी शाळेकडे पाठ फिरविली आहे. त्यामानाने खाजगी शाळेतील शिक्षणपध्दती चांगली असल्याने विद्यार्थी संख्या वाढली आहे. खाजगी शाळेत अव्वाचे सव्वा फी घेतात तरीही पालक तो खर्च नाईलाजाने करीत असतो. त्यामुळे खाजगी शाळांची चांदी होणार आहे.

Web Title: 465 vacancies of ZP School vacant: Recruitment of new teachers stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.