४७३ मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीच्या नोटिस!

By admin | Published: March 4, 2017 02:14 AM2017-03-04T02:14:53+5:302017-03-04T02:14:53+5:30

मोठे थकबाकीदार खामगाव पालिकेच्या रडारवर; २८८ बड्या थकबाकीदारांची यादी तयार.

473 property owners seize property seizure! | ४७३ मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीच्या नोटिस!

४७३ मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीच्या नोटिस!

Next

खामगाव, दि. ३- : शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांवर कारवाईची मोहीम उघडल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने आता मालमत्ता कर न भरणार्‍या ४७३ मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीच्या नोटिस बजावल्या आहेत. पालिकेने २८८ बड्या थकबाकीदारांची यादी तयार केली असून, कारवाईचे पुढचे पाऊल म्हणून मोठय़ा आणि कर वसुलीत सहकार्य न करणार्‍यांना मालमत्ता जप्तीच्या नोटिस बजावल्या आहेत. त्यामुळे आगामी कालावधीत पालिका प्रशासन आणि थकबाकीदारांमध्ये ह्यसंघर्षह्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मार्च महिन्यात शंभर टक्के कर वसुलीचा आदेश नगर विकास विभागाने काढला आहे. या पार्श्‍वभूमीवर खामगाव नगरपालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली असून, या कारवाईचा एक भाग म्हणून थकबाकीदारांच्या याद्या चौका-चौकात प्रसिद्धीसाठी तयार केल्या आहेत. दरम्यान, या मोठय़ा थकबाकीदारांना सूचनावजा नोटिस बजावण्यात आल्या. या नोटिसवजा सूचनेकडे कानाडोळा करणार्‍या ४७३ थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीसाठी सक्तीच्या नोटिस बजावण्यात आल्या आहेत.
खामगाव शहरात मालमत्ता कर, पाणीपट्टी तसेच इतर विविध स्वरूपांच्या करापोटी कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये मालमत्ता कराची सर्वात जास्त थकबाकी आहे. त्यामुळे मालमत्ता कराच्या वसुलीसाठी गेल्या महिन्यात पालिका प्रशासनाकडून वसुलीची धडक मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये मोठय़ा थकबाकीदारांची प्रसिद्धीसाठी, तर १२५४ जणांना मालमत्ता जप्तीच्या कारवाईची सूचनावजा नोटिस देण्यात आली. यापैकी ४७३ थकबाकीदार वगळता इतरांनी सकारात्मक प्रतिसाद देत पालिकेत कराचा भरणा केला आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाच्या कारवाईकडे कानाडोळा करणार्‍यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये मालमत्ता जप्ती सोबतच नळ कनेक्शनही कापण्यात येणार आहे. सोबतच इतरही दंडात्मक कारवाई आणि नामुष्कीसाठी तयार रहावे लागणार असल्याचे सुतोवाच पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

शासकीय कार्यालयेही कारवाईच्या घेर्‍यात!
शहरातील २३ शासकीय कार्यालयांकडेही पालिकेची लक्षावधींची थकबाकी आहे. मालमत्ता करासाठी या कार्यालयांकडे तगादा लावल्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सुमारे ५0 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे आता सक्तीच्या कारवाईच्या घेर्‍यात शहरातील मोठी प्रशासकीय कार्यालयेही येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

वसुली पथकेही होणार कार्यान्वित!
मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी मागणीपत्रांचे वितरण करण्यात आले. शहरातील सर्वच २९ हजार ७00 मालमत्ताधारकांचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर सूचनावजा नोटिस बजावण्यात आल्या. मात्र, पालिका प्रशासनाच्या या मोहिमांकडे कानाडोळा केला जात असल्यामुळे पालिकेने मोठय़ा थकबाकीदारांची यादी तयार केली. आता मोठय़ा थकबाकीदारांसोबतच गेल्या अनेक वर्षांंपासून पालिकेच्या कराचा भरणा न करणार्‍यांना मालमत्ता जप्तीच्या नोटिस बजावण्यात आल्या आहेत. तसेच कारवाईचा पुढील टप्पा म्हणून कर वसुलीसाठी विशेष पथकेही कार्यान्वित करण्यात आली आहेत.


शंभर टक्के कर वसुलीसाठी पालिकेचे प्रयत्न आहेत. त्या दृष्टीने पालिका प्रशासनाने संपूर्ण उपाययोजना केली आहे. यासाठी वसुली पथकही तयार केले असून, मोठय़ा थकबाकीदारांच्या नावाची यादीही तयार केली आहे. नागरिकांनी कर वसुलीत सहकार्य करावे.
- प्रशांत रोडे, मुख्याधिकारी, खामगाव.

Web Title: 473 property owners seize property seizure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.