कोविड सेंटरमधील कंत्राटी ४९० कर्मचाऱ्यांना हवी कायम नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:25 AM2020-12-27T04:25:55+5:302020-12-27T04:25:55+5:30
ज्या काळात कोरोनाची साथ महत्तम स्तरावर होती त्या काळात आपला जीव धोक्यात घालून या ४९० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा दिली ...
ज्या काळात कोरोनाची साथ महत्तम स्तरावर होती त्या काळात आपला जीव धोक्यात घालून या ४९० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा दिली होती. यामध्ये डॉक्टर, नर्स, कक्ष सेवक, सफाई कामगार, ईसीजी, एक्सरे तज्ज्ञ, कोविड मेडिकल ऑफिसर, दोन फिजिशियन (एमडी), फार्मासिस्ट, डाटा ऑपरेटर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
जिल्ह्यात ३५ पेक्षा अधिक ठिकाणी कोविड केअर सेंटर कोरोना लाटेच्या पहिल्या टप्प्यात उघडण्यात आले होते. त्यावेळी तातडीने कंत्राटी स्तरावर आरोग्य विभागात या कर्मचाऱ्यांना, डॉक्टरांना सामावून घेण्यात आले होते; मात्र नंतर जसजसे रुग्ण कमी होऊ लागले व कोविड केअर सेंटर व रुग्णालयासाठी आवश्यक कर्मचारी वर्ग अतिरिक्त ठरू लागला. त्यामुळे एक प्रकारे ‘गरज सरो वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे हे कर्मचारी कमी करण्यात येऊ लागले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी त्यांची संघटना स्थापन करून आंदोलनात्मक भूमिका घेतली होती. त्यानुषंगाने प्रथम जिल्हाधिका-यांना निवेदनही देण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता.
उस्मानाबाद येथील कर्मचाऱ्यांनी या प्रश्नी आंदोलनात्मक भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांना, आरोग्यमंत्र्यांना निवेदन देऊन १ जानेवारी रोजी आझाद मैदान ते मंत्रालय असा शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कंत्राटी कर्मचारी संघटनेचे शेख जहीर शेख शब्बीर यांनी दिली. दरम्यान, सेवेत कायम करण्याची या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची मागणी असल्याचे अमोलकुमार गवई, दयानंद गवई, भूषण रावे, अरुण शेळके म्हणाले.n लाेकमत न्यूज नेटवर्क
कंत्राटी स्टाफ कामावर नसल्यामुळे बेरोजगारी
टप्प्याटप्प्याने कोविड सेंटर बंद करण्यात येत आहे. त्यामुळे येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येत आहे. परिणामी त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड पडत आहे. जिल्ह्यातील ४९० कर्मचाऱ्यांसमोर सध्या बेरोजगारीची समस्या उभी ठाकली आहे. त्यामुळे मागण्यांचा साकल्याने विचार करण्याची त्यांची मागणी आहे.
कोविड सेंटरमध्ये असे आहेत कर्मचारी
जिल्ह्यात कोविड हॉस्पिटल मॅनेजर एक, १६ सीएमओ, दोन फिजिशियन (एमडी), स्टोरअर किपर-१, डाटा ॲापरेटर तीन, लॅब तंत्रज्ञ पाच, ईसीजी, एक्सरे तज्ज्ञ १२, कक्षसेवक १७, सफाई कामगार २०, परिचारिका व परिचारक ४० याप्रमाणे बुलडाणा येथे कोविड कंत्राटी कर्मचारी आहेत. यासोबतच जिल्ह्यातील अन्य कोविड सेंटरवरही पदभरती करण्यात आली होती. सर्व ठिकाणचे मिळून जिल्ह्यात ४९० कर्मचारी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोट
अचानक कमी करून एक प्रकारे कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळत आहे. त्यामुळे सेवेत कायम करावे किंवा पदभरतीमध्ये ५० टक्के आरक्षण द्यावे ही आमची प्रमुख मागणी आहे. किमान पदभरती करताना पहिली पसंती आम्हाला द्यावी.
- प्रशांत ठेंग,
कंत्राटी कर्मचारी
एक जानेवारी रोजी मुंबईत मंत्रालयावर सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन देण्यात आले आहे. मागण्यांचा सकल्याने विचार व्हावा.
- शेख जहीर शेख शब्बीर,
कंत्राटी कर्मचारी
कामवरून कमी न करता सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे
राष्ट्रीय आरोग्य अभियानात सामावून घेण्यासही प्राधान्य द्यावे
आरोग्य विभागातील पदभरतीत प्रथम प्राधान्य दिले जावे
पदभरतीमध्ये ५० टक्के आरक्षण दिल्यास सेवा दर्जेदारपणे देता येईल