५ लाख अन् सोन्याचे दागिने द्या, अन्यथा पोलिसात तक्रार; सुनेची आर्थिक मागणी; कंटाळून सासऱ्याची आत्महत्या
By सदानंद सिरसाट | Published: August 29, 2023 04:48 PM2023-08-29T16:48:03+5:302023-08-29T16:52:05+5:30
पत्नीसह आठ जणांविरुद्ध मंगळवारी पहाटे पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.
खामगाव : घरात नांदावयाचे नाही, लग्नासाठी झालेला पाच लाख रुपये खर्च व सोन्याचे दागिने परत द्या, अन्यथा पोलिसात तक्रार करेन, अशी धमकी पत्नीसह तिच्या नातेवाईकांनी दिल्याने वडिलांनी आत्महत्या केल्याची तक्रार पतीने मलकापूर शहर पोलिसात केली आहे. त्यावरून पत्नीसह आठ जणांविरुद्ध मंगळवारी पहाटे पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.
मलकापूर शहरातील गोदावरी नगरातील रहिवासी कल्पेश मधुकर सोनोने (२३) यांनी याबाबत तक्रार केली. त्यामध्ये कल्पेशच्या लग्नांनतर १५ दिवसांनीच पत्नीने छोट्या-छोट्या कारणांवरून वाद सुरू केला. तसेच पतीसोबत राहायचे नाही, माहेरी सोडून द्या, असा तगादा लावला. माहेरी सोडून दिल्यानंतर लग्नाला खर्च झालेले पाच लाख रुपये आणि सोन्याचे दागिने द्या, अन्यथा पोलिसात तक्रार करून खोट्या गुन्ह्यात अडकवून टाकीन, अशी धमकी पत्नीने दिल्याचे म्हटले आहे.
तसेच पत्नीच्या नातेवाईकांनीही प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीद्वारे रक्कम व दागिन्यांची मागणी करत सतत शिवीगाळ व धमक्या दिल्याने वडिलांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे नमूद केले. पत्नीसह इतर आठ जणांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरती कल्पेश सोनोने (२२, पातोंडा ता. नांदुरा), रघुनाथ निनाजी झाल्टे (५५), अनिता रघुनाथ झाल्टे (४६), वैभव रघुनाथ झाल्टे (२५), शुभांगी प्रवीण बावस्कार (३२, लोणवडी ता. मलकापूर), विजय माणिकराव बाम्हंदे (४५), कृषवर्ता विजय बाम्हदे (दोन्ही रा. औरंगाबाद), काशीनाथ न्हावकर (५०, रा. हनुमान टॉकीजमागे मलकापूर) यांच्यावर भादंविच्या कलम ३०६, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनी राजेंद्र पवार करीत आहेत.