शाळांमध्ये शिक्षकांची राहणार ५० टक्के उपस्थिती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:23 AM2021-06-19T04:23:24+5:302021-06-19T04:23:24+5:30
कोरोनामुळे उपाययोजना कराव्यात कोरोनाचा प्रभाव ओसरला असला तरी, कोरोना कमी झालेला नाही. त्यामुळे शाळा मुख्याध्यापकांनी शाळा सुरू ...
कोरोनामुळे उपाययोजना कराव्यात
कोरोनाचा प्रभाव ओसरला असला तरी, कोरोना कमी झालेला नाही. त्यामुळे शाळा मुख्याध्यापकांनी शाळा सुरू करण्यापूर्वी शाळांचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. ५० टक्के उपस्थिती असली तरी, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद आणि संचालकांचे पत्र
शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण संचालकांनी पत्र काढले आहे. त्यामध्ये शिक्षकांची शाळेत ५० टक्के उपस्थिती ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. दरम्यान, काही जिल्ह्यांमध्ये शिक्षण संचालकांनी ५० टक्के उपस्थिती, तर जिल्हा परिषदेच्या सूचनेनुसार १०० टक्के उपस्थिती अनिवार्य म्हटली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे; परंतु बुलडाणा जिल्ह्यात शिक्षण संचालकांच्या पत्रानुसारच जिल्हा परिषदेनेही ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे; परंतु शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मात्र १०० टक्के उपस्थित राहणार आहे.
सर्वच माध्यमांच्या शाळांसाठी बंधनकारक
जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा २८ जूनपासून सुरू होत आहेत; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाइन वर्ग राहणार आहेत. दरम्यान, शिक्षण संचालकांच्या पत्रानुसारच जिल्ह्यातील शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती राहणार आहे. उपस्थितीचा निर्णय केवळ जिल्हा परिषद शिक्षकांसाठीच नाही, तर खासगी शाळा, नगरपालिका, माध्यमिक शाळा, आदी सर्वच माध्यमांच्या शाळांसाठी आहे. सर्व शिक्षकांनी या निर्णयाचे पालन करावे.
- सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, बुलडाणा.
जिल्ह्यातील शाळा - २४७५
जिल्हा परिषद शाळा - १४३८
अनुदानित शाळा - ३९८
विनाअनुदानित शाळा - ८२