चंद्रयानात लागल्या खामगावच्या ५० चांदीच्या नळ्या, थर्मल शिल्ड!
By अनिल गवई | Published: August 23, 2023 08:34 PM2023-08-23T20:34:09+5:302023-08-23T20:34:26+5:30
ऐतिहासिक सुवर्णक्षणाची रजतनगरी साक्षीदार : खामगावकरांसाठी गौरवाची बाब
खामगाव (बुलढाणा): भारताच्या ‘चंद्रयान ३’ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बुधवारी सायकांळी यशस्वी लॅण्डींग केल्याचा क्षण जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंदविला गेला. त्याच्यक्षणी रजतनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या खामगावचाही स्पर्श चंद्राला झाला. खामगावातील श्रद्धा रिफायनरीमध्ये तयार केलेल्या ५० सिल्व्हरच्या नळ्या तसेच विकमशी फॅब्रिक्स प्रा. लि. ने निर्माण केलेल्या थर्मल शिल्ड प्रोडक्टचा चंद्रयानमध्ये वापर झाल्याने खामगावकरांसाठी ही गाैरवाची बाब असल्याच्या प्रतिक्रीया समाजमनात उमटत आहेत.
चंद्रयानाचे चंद्रावर लॅन्डीग होताच, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला असतानाच या चंद्रयानात खामगाव येथील विकमशी फॅब्रिक्स प्रा. लि. ने निर्माण केलेल्या थर्मल शिल्ड प्रोडक्टचा चांद्रयान ३ मध्ये वापर करण्यात आला आहे. तसेच खामगावातील औद्योगिक वसाहतीतील श्रद्धा रिफायनरीमध्ये तयार झालेल्या ५० सिल्व्हर स्टर्लिंग ट्यूब्ज (नळ्या) चाही वापर झाला आहे. या माध्यमातून चंद्राला खामगावचा स्पर्श झाल्याची भावना खामगावकरांच्या मनात निर्माण झाली आहे. या ऐतिहासिक सुवर्णक्षणाची रजतनगरी साक्षीदार असल्याचा अभिमान आता खामगावकर बाळगत आहे.
खामगावात जल्लोष
चंद्रयान ३ चंद्रावर उतरताच खामगावात फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष करण्यात आला. तत्पूर्वी खामगावातील चौका चौकात चंद्रयानाचे थेट प्रक्षेपण सामूहिक रित्या पाहण्यात आले. हिंदुत्व ग्रुपने यावेळी हनुमान चालिसाचे पठण केले.
चंद्रयान ३ मध्ये खामगाव येथील थर्मल शिल्ड सोबतच चांदीच्या नळकांड्यांचा वापर झाला आहे. आता चंद्रयानाने कठीण अशी परीक्षा उत्तीर्ण करीत देशवासीयांचा विश्वास सार्थ ठरविला आहे. ही बाब निश्चितच माझ्यासह तमाम भारतीयांसाठी आनंददायी आहे.- गितिका विकमशी, संचालिका, विकमशी फॅब्रिक्स, खामगाव
चंद्रयानाची मोहिम यशस्वी होणे, ही सर्व भारतीयांसाठी अंत्यत अभिमानास्पद आहे. सर्वांचे प्रयत्न फळाला आले. श्रमाचे चीज झाल्याचे समाधान आहे. कंपनीतील प्रत्येकाचे त्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले- शेखर भोसले, संचालक, श्रद्धा रिफायनरीज, खामगाव.
देशाच्या संरक्षणाचा विषय असल्याने या मोहिमेतील यांत्रिक साहित्य निर्माण करताना आम्ही हवी ती काळजी घेतली. सर्व बाजू तपासून पाहिल्यानंतरच इस्रोला साहित्य पुरविले. पूर्वी आमच्या कंपनीतील विविध मोहिमांमध्ये साहित्य वापरल्याचा आम्हाला अभिमान आहे.
रमेश चौधरी, टेक्निकल मॅनेजर, विकमशी फॅब्रिक्स, खामगाव