सिंदखेडा राजा तालुक्यात ५० टक्के पेरणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:23 AM2021-06-20T04:23:59+5:302021-06-20T04:23:59+5:30
सिंदखेड राजा : तालुक्यात यंदाचा खरीप हंगाम सुरू झाला असून ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. येत्या आठ दिवसात ...
सिंदखेड राजा : तालुक्यात यंदाचा खरीप हंगाम सुरू झाला असून ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. येत्या आठ दिवसात तालुक्यातील ७० हजार हेक्टरवरील पेरण्या पूर्ण होतील असा दावा कृषी विभागाने केला आहे.
सिंदखेड राजा तालुक्यात एकूण ७१ हजार हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. यातील ७० हजार हेक्टर क्षेत्र लागवडी योग्य आहे. खरिपात कपाशी, सोयाबीन या पिकांवर शेतकऱ्यांचा अधिक भर असतो. मात्र, यंदा कपाशीचे क्षेत्र कमी होऊन तुरीचे क्षेत्र वाढविले पाहिजे यासाठी कृषी विभागाने प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येत असून कडधान्य पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मागील हंगामात कपाशी क्षेत्र २२ हजार हेक्टर होते, त्यात यंदा घट होणार असून १९ हजार हेक्टरवर कपाशी लागवड होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, या हंगामात आतापर्यंत ७ हजार हेक्टरवर कपाशी लागवड पूर्ण झाली आहे. सोयाबीन लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक म्हणजे ३४ हजार हेक्टर आहे. त्यातील १९ हजार हेक्टर पेरणी पूर्ण झाली आहे. तूर लागवड ६ हजार हेक्टरवर होते मात्र यावेळी कडधान्य विकास कार्यक्रमांतर्गत तूर, मूग, उडीद यांच्या पेरणीत वाढ होत आहे. कडधान्य सर्व पिके मिळून १२ हजार हेक्टर वाढ होणार आहे. इतर पिकांना देखील शेतकरी प्राधान्य देतात. परंतु कडधान्य विकास कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी होऊन आपले उत्पन्न वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मका लागवड क्षेत्र एक ते दीड हजार हेक्टरवर असेल. भुईमूग व अन्य पिकांना देखील शेतकरी प्राधान्य देताना दिसत आहेत.
-- तालुक्यात सर्वदूर पाऊस--
दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने पेरणीला वेग आला आहे. बुधवारी झालेला पाऊस तालुक्यात सर्वदूर पडल्याने शेतकरी सुखावला आहे. तालुक्यातील राजेगाव शिवारात जास्त पाऊस झाल्याने तेथील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. अर्थात पेरणी पूर्वी झालेलं पाऊस असल्याने चार दिवस पेरणी पुढे ढकलावी लागणार आहे. यंदा पाऊस समाधान कारक झाल्यास शेतकऱ्यांचे अर्थचक्र सुधारेल.