काेविड सेंटरवरील ५०० कंत्राटी कर्मचारी झाले बेराेजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:41 AM2021-09-07T04:41:30+5:302021-09-07T04:41:30+5:30
संदीप वानखडे बुलडाणा : काेराेना संक्रमण वाढल्याने आराेग्य व्यवस्थेवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी काेविड सेंटरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात ...
संदीप वानखडे
बुलडाणा : काेराेना संक्रमण वाढल्याने आराेग्य व्यवस्थेवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी काेविड सेंटरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली हाेती़ पहिली लाटेदरम्यान जवळपास ७३८ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली हाेती़ त्यापैकी आतापर्यंत ५०० कर्मचारी कार्यमुक्त करण्यात आले आहेत़ केंद्र सरकारने निधी देण्यास असमर्थता व्यक्त केल्याने तिसऱ्या लाटेचा धाेका असतानाही कंत्राटी कर्मचारी कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे चित्र आहे़ दुसरीकडे कंत्राटी कर्मचारी आक्रमक झाले असून कायम सेवेत समावून घेण्याची मागणी करत आहेत़
जिल्ह्यात गतवर्षी काेराेना संक्रमण माेठ्या प्रमाणात वाढल्याने आराेग्य यंत्रणेवर माेठ्या प्रमाणात ताण वाढला हाेता़ रुग्ण वाढत असल्याने तालुकानिहाय काेविड सेंटर सुरू करण्यात आले हाेते तसेच तेथे डाॅक्टरांसह परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली हाेती़ काेराेनाच्या काळात जीव धाेक्यात घालून रुग्णांवर उपचार करणाऱ्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पहिली लाट ओसरल्यानंतर कार्यमुक्त करण्यात आले़ त्यानंतर दुसरी लाट आल्याने पुन्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली़ दुसऱ्या लाट ओसरत असल्याने अनेक काेविड सेंटर बंद करण्यात आले आहेत़ तसेच २९२ कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे़ त्यातच रुग्णांची संख्याही वाढत असतानाच कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात येत आहे़ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एनएचएम अंतर्गंत ११ महिन्यांच्या करार तत्त्वावर तरी नियुक्त करावे, अशी मागणी हाेत आहे़
अनुभवी कर्मचाऱ्यांची कपात
गतवर्षापासून काेराेनाच्या रुग्णांवर उपचार करत असलेल्या डाॅक्टर आणि परिचारिकांना अनुभव आहे़ त्यातच तज्ज्ञांनी वर्तविलेली तिसरी लाट आली तर या कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा लाभ हाेऊ शकताे़ जीव धाेक्यात घालून रुग्णांची सेवा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरळ कार्यमुक्त करण्यात येत आहे़
काेराेनाच्या काळात जीव धाेक्यात टाकून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले़ दुसरीकडे शासनाने फंड बंद झाल्याचे कारण पुढे करत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे़ साथीचे राेग आल्यानंतर ९० दिवस काम करणारे कर्मचारी आज कायम सेवेत घेण्यात आले आहेत़ काेराेना काळात सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत ११ महिन्यांच्या कंत्राटावर घेण्याची गरज आहे़ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे़
अमोलकुमार गवई, जिल्हाध्यक्ष ,
कोविड आरोग्य कर्मचारी संघटना
कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सेवेचा विचार करून शासनाने कायम सेवेत घ्यावे़ तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा धाेका वर्तवलेला असतानाच कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात येत आहे़ प्रशासनाचा हा निर्णय चुकीचा असून या निर्णयावर फेरविचार करण्याची गरज आहे़
संदीप भालेराव, कोविड कर्मचारी, जिल्हा संघटन प्रमुख
काेराेनाच्या काळात तुटपुंज्या मानधनावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात येत आहे़ प्रशासनाच्या या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे़ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याची गरज आहे़
डॉ. हृषिकेश देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष, कोविड कर्मचारी संघटना
शासनाच्या आदेशानुसार काेविड सेंटरवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे़ पुन्हा गरज पडल्यास याच कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्ती देण्यात येणार आहे़
डाॅ़ नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा