लोणार तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाच्या ५०० चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:06 AM2021-02-21T05:06:18+5:302021-02-21T05:06:18+5:30
कोविड केंद्राच्या नियोजनाच्या माध्यमातून एकाच दिवसात लोणार शहरासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत कोरोना चाचण्या करण्यासाठी शिबिर लावण्यात आले ...
कोविड केंद्राच्या नियोजनाच्या माध्यमातून एकाच दिवसात लोणार शहरासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत कोरोना चाचण्या करण्यासाठी शिबिर लावण्यात आले होते. दरम्यान, एकाच दिवशी ५०० चाचण्या करण्यात आल्या आहेत. लोणारचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किसन राठोड, वैद्यकीय अधीक्षक फिरोजशाह यांच्या मार्गदर्शनात कोविड सेंटरचे व्यवस्थापक डॉ. भास्कर मापारी, हिरडव सुलतानपृर प्राथमिक आरोग्य केंदाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद जायभाये, रायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सानप, शिवनी पिसाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यमगिर यांनी या शिबिरांचे आयोजन केले होते.
तालुक्यातील लोणार, दाभा, अंजनी खुर्द, रायगाव या गावात केले होते. या शिबिरात रॅपिड टेस्ट एकूण २१५ करण्यात आल्या. यापैकी नऊ रुग्ण कोरोनाबाधित आढळले. दरम्यान २८५ जणांचे नमुने बुलडाणा येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सध्या तालुक्यातील ५४ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यातील ही सर्वाधिक सक्रिय रुग्णाची संख्या असल्याने यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
आणखी चाचण्या वाढण्याची शक्यता
लोणार शहर न. पा. चे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी शहरातील प्रत्येक दुकानदाराने कोरोना चाचणी करावी अन्यथा कारवाई केली जाईल, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत संपूर्ण तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोना चाचण्या करण्यात येतील, अशी माहिती कोविड सेंटरचे व्यवस्थापक डॉ. भास्कर मापारी यांनी दिली आहे.
आरोग्य विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता
मध्यंतरी कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने लोणार येथील एक कोविड सेंटर बंद करून कर्मचारी घरी बसविण्यात आले होते. आता आरोग्य विभागाला मनुष्यबळ कमी पडत आहे. आज अंजनी येथील शिबिरात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किसन राठोड यांनी स्वत: रुग्णाचे स्वॅब नमुने घेतल्याचे दिसून आले