जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये गतवर्षीपेक्षा ५२ टक्के कमी जलसाठा
By विवेक चांदुरकर | Published: August 30, 2023 05:14 PM2023-08-30T17:14:32+5:302023-08-30T17:14:59+5:30
आगामी दिवसांमध्ये मुबलक प्रमाणात पाऊस झाला नाही तर पुढील वर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
खामगाव : जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये गतवर्षीपेक्षा यावर्षी तब्बल ५२.६७ टक्के कमी जलसाठा आहे. गतवर्षी ७६.२८ टक्के जलसाठा होता तर यावर्षी केवळ २३.६१ टक्के जलसाठा आहे. आगामी दिवसांमध्ये मुबलक प्रमाणात पाऊस झाला नाही तर पुढील वर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
यावर्षी जून महिन्यामध्ये अल्प पाऊस झाला. त्यानंतर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात पाऊस झाल्यानंतर पुन्हा पावसाचा खंड पडला. जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात २४ ऑगस्टपर्यंत गतवर्षी ५७.७६ टक्के जलसाठा होता तर यावर्षी २६.४८ टक्के आहे. खडकपूर्णा प्रकल्पात गतवर्षी ८७.५६ टक्के जलसाठा होता तर यावर्षी केवळ ५.५ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात गतवर्षी ८०.१३ टक़्के तर यावर्षी ४९.१७ टक्के जलसाठा आहे.
जिल्ह्यातील ज्ञानगंगा, मस, कोराडी, पलढग, मन, तोरणा, उतावळी या मध्यम प्रकल्पांमध्ये ५१.५८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये ८६.२९ टक्के जलसाठा होता. तसेच २० लघु प्रकल्पांमध्ये केवळ ८.३७ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी या लघु प्रकल्पांमध्ये ३४.६७ टक्के जलसाठा होता.
तसेच वर्हाडातील पाचही जिल्ह्यांतील प्रकल्पांमध्ये यावर्षी गतवर्षीपेक्षा १३ टक्के कमी जलसाठा आहे. गतवर्षी ९ मोठ्या प्रकल्पांमध्ये ८३.४९ टक्के जलसाठा होता. तर यावर्षी प्रकल्पांमध्ये ६९.६४ टक्के जलसाठा आहे.
अमरावती विभागात ९ मोठे प्रकल्प आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्प, अरूणावती, बेंबळा, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, वान, बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी, खडकपूर्णा या प्रकल्पांचा समावेश आहे. वर्हाडातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ६९.६४ टक्के जलसाठा आहे.